औरंगाबाद: औरंगाबाद विभागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून दररोज ७० हजारापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या जीविताला चालकांच्या बेजबाबदारपणामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून महामंडळाने २०१४ मध्ये विभागात ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझर (बीएए) नावाची २२ यंत्रे दिली होती. चालक दारू प्यायला आहे की नाही हे त्या यंत्राने तपासता येते. त्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली. विभागात सध्या १ हजार १३० चालक आहेत. मात्र, सध्या आठ डेपोमध्ये ६ यंत्रे तपासणीसाठी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विभागात १ हजार १३० चालक आहेत. त्यातील बहुतांश चालक निव्यंसनी आहेत; पण अनेकदा रस्त्यावर एसटी वेगाने आणि बेजबाबदारपणे धावताना अपघात झाल्याच्या घटना पडल्या आहेत. त्या वेळी प्रवासी चालकाविषयी तक्रार करतात. अपघात झाल्यानंतर चालकाचे दारू पिणे समोर येण्यापेक्षा आधीच ती तपासणी करता यावी यासाठी आधुनिक प्रकारची २२ तपासणी यंत्रे विभागास देण्यात आली होती आता ६ यंत्रे उरली आहे.
संशय आल्यावर होते तपासणी…
चालकांची तपासणी करण्यासाठी विभागात अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक आणि सहायक वाहतूक नियंत्रक यांचा समावेश आहे. या पथकाकडून संशय आल्यावर चालकांची तपासणी केली जाते.
पाच सेकंदात समजते….
ही यंत्र आधुनिक स्वरूपाची आहेत. ज्याची तपासणी करायची आहे त्याने फुंकर मारली नाही आणि यंत्र पाच सेकंद त्या व्यक्तीच्या तोंडात राहिले तरी त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण किती आहे याची माहिती हे यंत्र देऊ शकते, त्यामुळे संशयिताच्या रक्ताची तपासणी करण्याची गरज भासत नाही.
आठ पैकी सहा यंत्रे सुरु
आठ डेपोसाठी आमच्याकडे आठ यंत्रे आहेत. परंतु दोन यंत्रे नादुरुस्त असल्यामुळे सहा यंत्रे सध्या उपलब्ध आहेत. दीड महिन्यापासून यंत्रे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. जानेवारी ते आतापर्यंत एकही चालक आम्हाला सापडलेला नाही.
पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी