आजच्या या धावपळीच्या काळातही प्रत्येकालाच वाटत असतं आपणं सुंदर दिसावं. अनेक वेळा आपण विविध सौंदर्य प्रसाधन किंवा ब्युटीपार्लरचा आधार घेतो. मात्र सौंदर्य प्रसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे त्वचेवर त्याचा हानीकारक परिणाम होतो.
चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या, पिंपल्स यांसारख्या समस्या निर्माण होताता. या समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी आपण अनेक वेळा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन ब्लीच, फेशियल यांचा वापर करतो. मात्र अनेक वेळा त्याचाही उलट परिणाम होतो.
काहींना ब्लीच किंवा फेशियल सूट होत नाही. त्यातूनच मग चेहऱ्याची जळजळ किंवा चेहऱ्यावर लाल रंगाचे रॅशेस येतात. या साऱ्यातून जर सुटका करायची असेल आणि ब्लीच करण्याचा आनंदही घ्यायचा असेल तर त्यावर एक सर्वोत्तम पर्याय आहे, तो म्हणजे घरी तयार केलेलं नैसर्गिक पद्धतीचं ब्लीच.
होयं अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने हे ब्लीच तयार होऊ शकतं. याबाबत जाणून गचला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी कसं तयार करायचं ब्लीच-
दही
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे एका वाटीमध्ये थोडसं दही घ्यावं. त्यानंतर दह्याने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. दहा मिनीटे मसाज झाल्यानंतर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. दही हा नैसर्गिक पद्धतीने ब्लीच करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे त्वचा सॉफ्ट होण्यास मदत होते.
बटाटा
भाजीमध्ये लहानसा बटाटा टाकला की त्या भाजीची चव वाढते. सोबतच तो त्या भाजीमध्ये समरसूनही जातो. त्यामुळे साऱ्या भाज्यांमध्ये बटाट्याला विशेष मान. मात्र हा बटाटा केवळ भाजी पूरताच मर्यादित नाही. सौंदर्यांत भर टाकण्यासाठी याचा विशेष वापर केला जातो. बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करुन हा लेप चेहऱ्यावर लावावा. लेप सुकल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा प्रयोग एक दिवसाआड करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते.
पपई
बाराही महिने बाजारात उपलब्ध होणारं फळं म्हणजे पपई. पपईचे अनेक गुणधर्म आहेत. केवळ खाण्यासाठीच नाही तर सौंदर्यामध्ये वाढ करण्यासाठीही पपईचा उपयोग केला जातो. जर घरी ब्लीच तयार करायचं असेल तर पपई सर्वोत्तम पर्याय आहे. पपईचा गर काढून तो (स्मॅश) हाताने बारीक करावा. हा लेप दिवसातून रोज एकदा चेहऱ्यावर लावावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा प्रयोग रोज केल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो. चेहऱ्यावरील डाग असतील तर तेदेखील दूर होतात.
लिंबू
लिंबाचे अनेक फायदे आहेत. अनेक वेळा सौंदर्य प्रसाधनांमध्येही त्याचा वापर करण्यात येतो. नैसर्गिक ब्लीच म्हणूनही लिंबाकडे पाहिलं जातं. केवळ ब्लीचच नाही, तर स्क्रब म्हणूनही त्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस चेहऱ्यावर लावावा. लिंबाच्या रसामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी नष्ट होतात.
टोमॅटो
टोमॅटोच्या रसामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. दिवसातून एकदा रोज टोमॅटोच्या रसाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. नंतर काही काळ हा लेप चेहऱ्यावर वाळू द्या. लेप सुकल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.