हाँगकाँगमध्ये पसरतेय रहस्यमय विषाणूची साथ; आतापर्यंत सात जाणांचा मृत्यू

hong-kong-wet-markets-report-outbreak-of-bacterial-infection-linked-to-freshwater-fish-7-dead-so-far-authorities-on-alert-news-update
hong-kong-wet-markets-report-outbreak-of-bacterial-infection-linked-to-freshwater-fish-7-dead-so-far-authorities-on-alert-news-update

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना हाँगकाँगमध्ये एका रहस्यमय आजराची साथ पसरली आहे. या साथीमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना गोड्या पाण्यातील मासे आणि सी फूडसंदर्भात इशारा दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमधील वेट मार्केट्स म्हणजेच मासळी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी विक्री होते. याच ठिकाणाहून बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रसार झाला आहे. गुरुवारपर्यंत जात जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिलाय. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन या हाँगकाँगमधील आरोग्य विषय संस्थेने ज्या विषाणूमुळे सात जणांचा मृत्यू झालाय तो विषाणू कोणता आहे याबद्दल खुलासा केल्याचं हाँगकाँगमधील एचपीएफपी नावाच्या वेबासाईटने आपल्या वृत्तात म्हटलंय.

एसटी २८३ स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचा संसर्ग…

मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना एसटी २८३ स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता असं आरोग्यविषय संस्था असणाऱ्या सीएचपीने स्पष्ट केलंय. तसेच हा संसर्ग एकूण ३२ जणांना झाल्याचं सांगण्यात आलं आहे. माशांच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात या विषाणूने कसा शिरकाव केला याचा तपास केला जात आहे. संसर्ग झालेल्यांपैकी अनेकजण हे मासेमारी करणारे असून ते साध्या हातांनी मच्छी हाताळायचे. काहीजण तर जखमा असतानाही मासे हाताळत असल्याने तिथून संसर्ग झाल्याची शक्यता सीएचपीने व्यक्त केलीय.

या विषाणूचा संसर्ग झाल्यास रक्त, हाडं, फुफ्फुसांच्या क्रियांवर परिणाम होतो. या विषाणूचा संसर्ग लहान मुलं, वयस्कर व्यक्ती किंवा पूर्वीपासून एखादा आजार असणाऱ्यांसाठी घातक ठरु शकतो.

चीननेही पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली

दुसरीकडे चीननेही पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. 

चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. बाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असून अनेक पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. तसंच मनोरंजनाच्या अनेक ठिकाणी टाळं लावण्यात आलं आहे. काही भागांमध्ये तर लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे.

घराबाहेर पडू नका

दुसरीकडे चीनच्या लॅनझोहू भागात लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर घराबाहेर पडणाऱ्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

विमानांचं उड्डाण रद्द, लॉकडाउनचाही निर्णय…

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शीआन आणि लॅनझोहू येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे. सध्या चीनमध्ये गेल्या २४ तासाच १३ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही अॅक्टिव्ह रुग्ण आढळू नये यासाठी चीनकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळेच एकही रुग्ण सापडला तरी चिनी प्रशासन गांभीर्याने घेत आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here