मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार काढायचा असेल तर भाजपाने २ वर्षांची नव्हे २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे आव्हान

We don't want a burning Maharashtra, we want a Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj, Shahu, Phule, Ambedkar Says Nana Patole
We don't want a burning Maharashtra, we want a Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj, Shahu, Phule, Ambedkar Says Nana Patole

मुंबई:राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाला ब्लॅकमेल करत असतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कसे आले हे सर्वांनी पाहिले आहे. एक तर ईडी, आयकर, सीबीआयच्या कारवाईची भिती दाखवायची नाहीतर पैशाचे आमिष दाखवून आमदार-खासदार फोडायचे हे त्यांचे काम आहे. मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षही २५ वर्ष सत्तेत होता. या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी ते का करत नाहीत? चौकशी करायची तर मुळापासून करायली हवी, मात्र केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाईची मागणी केली जात आहे, हे राजकीय द्वेषातून सुरु आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून जनतेत संभ्रम निर्माण करायचा व आपली राजकीय पोळी भाजायची हे भाजपाचे कारस्थान आहे.

कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची जगानेही दखल घेतली आहे मात्र भाजपाला त्यात भ्रष्टाचार दिसत आहे. भाजपाच्या राज्यात कोरोनाकाळात किती भयानक स्थिती होती हे आपण पाहिले आहे पण स्वतःच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करायचे व विरोधकांवर आरोप करायचे हा खेळ लोकांना समजतो. मुंबईतील जनताही भारतीय जनता पक्षाच्या अशा ब्लॅकमेलिंगला ओळखून आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here