मुंबई : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz jaleel) यांची पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद्दुद्दीन ओवेसी यांनी सोमवार (9 सप्टेंबर) रोजी इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, मतदारसंघाचे नाव जाहीर केले नव्हते. इम्तियाज जलील हेच पूर्व मतदारसंघातील उमेदवार असणार आहेत अशी माहिती एमआएमच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. पूर्व मतदारसंघातील प्रबळ दावेदार डॉ. गप्फार कादरी यांचा पत्ता कट झाला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या अध्यक्षतेखाली दीड महिन्यापूर्वी शहरात राज्याच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली होती. बैठकीनंतर कोणत्याही हालचाली नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह गेला होता. मात्र, सोमवारी इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा होताच मतदारसंघ कोणता याची चर्चा सुरु होती. मात्र, पूर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील हेच उमेदवार राहणार आहे. त्या दृष्टीकोनातून इम्तियाज जलील मतदारसंघात लवकरच दौ-याला सुरुवात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. गफ्फार कादरींचा झाला होता दोन वेळा पराभव –पूर्व मतदारसंघात सलग दोन वेळा डॉ. गफ्फार कादरी यांना विधानसभेत पराभवाला समोरे जावे लागले होते. डॉ. गफ्फार कादीर यांना उमेदवारी देऊ नका अशा पक्षातील पदाधिका-यांच्यात तक्रारी होत्या. अशीही चर्चा एमआयएमच्या गोटात सुरु आहे. इम्तियाज जलील यांचा लोकसभेतील पराभव असदुद्दीन ओवेसी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. इम्तियाज जलील यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवायचे. त्यांची खूप गरज आहे. असे ओवेसी यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते.
माजी नगरसेवकांचा होता डॉ. कादरींना विरोध- डॉ.गफ्फार कादरी यांना पक्षातून जोरदार विरोध होता. विशेष म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वीच किराडपु-यातील मुस्लिम महिलांबद्दल आक्षेपहार्य विधान केले होते. त्या विधानावरून पक्षातील पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त करत थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या अशीही चर्चा एमआयएमच्या गोटात सुरु आहे. माजी नगरसेवकांनी कादरी यांनी तिकीट देऊ नये म्हणून तक्रारी केल्या होत्या हे विशेष.