हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये; कुरुलकरांच्या एटीएस कोठडीत एक दिवस वाढ

in-drdo-pune-kurulkar-case-senior-air-force-officer-nikhil-shende-is-also-in-honey-trap-by-pakistani-intelligence-pune-print-news-rbk-25-news-update
in-drdo-pune-kurulkar-case-senior-air-force-officer-nikhil-shende-is-also-in-honey-trap-by-pakistani-intelligence-pune-print-news-rbk-25-news-update

पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी विशेष न्यायालयात दिली. तांत्रिक तपासासाठी कुरुलकरांच्या एटीएस कोठडीत एक दिवस वाढ करण्याची विनंती एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर यांना मंगळवारपर्यंत (१६ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेंडे सध्या बंगळुरू येथे नियुक्तीस आहेत. त्यांची हवाई दलातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडूनही (एटीएस) त्यांची चौकशी करण्यात आली असून त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदविण्यात आला आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विशेष न्यायालयात सांगितले.

पाकिस्तानातून संदेश

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हवाई दलातील अधिकारी निखिल शेंडे यांना मोहजालात अडकविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. शेंडे यांची बंगळुरूतील हवाई दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. शेंडे यांचा न्यायालयासमोर जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले नाही. कुरुलकर आणि शेंडे यांना पाठविण्यात आलेले संदेश पाकिस्तानी आयपी ॲड्रेसवरून पाठविण्यात आल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीची मुदत सोमवारी (१५ मे) संपली. त्यानंतर कुरुलकर यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले.

कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून,याबाबतचा अहवाल मिळाला आहे. कुरुलकर यांच्या उपस्थितीत मोबाइल संचातील काही माहिती घ्यायची आहे. तांत्रिक तपासासाठी कुरुलकर यांना एक दिवस कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकील ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी न्यायालयाकडे केली.

कुरुलकर यांच्यावतीने ॲड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर यांच्या कोठडीत मंगळवारपर्यंत (१६ मे) वाढ करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here