
मुंबई l दररोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडतच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला होता. दरम्यान दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र अद्यापही दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडत आहे. दररोज समोर येणारी देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही कधी कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे.
आज करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, परंतु मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४२,७७६ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर १,२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४५,२५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत देशात ३,०७,९५, ७१६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २,९९,३३,५३८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ४,०७,१४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४,५५,०३३ कोरोना बाधित रुग्ण आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेत केंद्र सरकारने पायाभूत आरोग्य सुविधांसाठी २३ हजार १२३ कोटींच्या मदतीची घोषणा गुरुवारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य सुविधांची सुसज्जता’ या योजनेंतर्गत केंद्राकडून १५ हजार कोटी व राज्यांकडून ८,१२३ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पुढील ९ महिन्यांमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
देशात लसीकरणाचा आकडा ३७ कोटींच्या पुढे
भारतात आतापर्यंत ३७ करोडपेक्षा अधिक करोना डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात गेल्या २४ तासांत २७ लाखापेक्षा अधीक लसींचे डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा
Mumbai Covid Vaccination l लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार!