नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या सेवा कर्मचार्यांना आणि पेन्शन धारकांना इतर शहराप्रमाणे औरंगाबाद शहरात हि आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अॅलोपॅथिक वेलनेस सेंटर (सीजीएचएस) कार्यान्वित करण्याची वेळोवेळी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी करुन यशस्वीरित्या पाठपूरावा केल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया (Dr.Mansukh Mandaviya) यांनी २२ मार्च २०२३ (बुधवार) रोजी सकाळी १०:०० वाजता औरंगाबाद शहरात सीजीएचएस सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पत्राव्दारे कळविली. तसेच खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांना उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे निमंत्रण ही दिले.
२२ मार्च रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत अॅलोपॅथिक वेलनेस सेंटर (सीजीएचएस) च्या उद्घाटनाची घोषणा केल्याबद्दल आनंद झाला ज्यामुळे औरंगाबाद मधील हजारो केंद्रीय शासकीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना फायदा होईल; आमची मागणी स्वीकारल्याबद्दल आपले सर्वांचे आभार आहे अशी प्रतिकिया खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, केंद्र सरकारची आरोग्य योजना (सीजीएचएस), ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची सर्वसमावेशक आरोग्य सेवा वितरण योजना आहे. जी केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये / विभागांच्या तसेच अखिल भारतीय सेवांमधील निवृत्ती वेतनधारकांना आरोग्य सुविधा पुरवते. शिवाय, ते माजी राज्यपाल, माननीय संसद सदस्य (खासदार), माजी खासदार इत्यादींसह विविध सरकारी मान्यवरांना वैद्यकीय सुविधांचा विस्तार करत आहे. तसेच सेवांच्या व्याप्तीमध्ये, विशेषत: २०१४ नंतर विस्तारले आहे. सध्या, ७७ शहरांमध्ये सीजीएचएस ३३६ अॅलोपॅथिक वेलनेस सेंटरचा समावेश आहे.
पूढे पत्रात नमूद केले की, या संदर्भात, मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, तामिळनाडू मधील कोईम्बतूर आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे अॅलोपॅथिक वेलनेस सेंटर (सीजीएचएस) कार्यान्वित होत आहे, ज्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये राहणार्या केंद्र सरकारच्या सेवा कर्मचार्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणी पूर्ण होत आहे. यासह, आमचे ७९ शहरांमध्ये सीजीएचएस ३३८ अॅलोपॅथिक वेलनेस सेंटर वाढणार असल्याची माहिती पत्राव्दारे दिली.