भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेतच इंडिया आघाडीचा लोकसभा प्रचाराचा शंखनाद

India Aghadi launched its Lok Sabha campaign at the concluding meeting of Bharat Jodo Nyaya Yatra in Mumbai
India Aghadi launched its Lok Sabha campaign at the concluding meeting of Bharat Jodo Nyaya Yatra in Mumbai

मुंबई: खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली, या बैठकीनंतर पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. शिवाजी पार्क मिळेल अशी अपेक्षा असून  राज्य सरकार अश्यात राजकारण करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीत येत आहे.  या महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकार करत आहे. भाजपा लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे.

भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत. भाजपा आता मोदी परिवार झाला असून जिंकण्याचा विश्वासही त्यांच्यात राहिलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते पण नाही. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे व यावर्षी विजयी पताका फडकवू तसेच सांगलीची जागासुद्धा काँग्रेस लढणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

आजच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अस्लम शेख, अमित देशमुख, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, आ. प्रणिती शिंदे, खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here