भारतीय सैन्याने न्यायाधीश महाधिवक्ता (JAG) ब्रांचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार Indian Army JAG Entry Scheme 29th Course 2022 साठी अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर जाऊन १७ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या कोर्ससाठीची अर्ज प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरु झाली आहे.
अधिकृत सूचनेनुसार, न्यायाधीश महाधिवक्ता प्रवेश २०२२च्या माध्यमातून एकूण ९ रिक्त पदांवर भरती केली जाईल. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ६ पद आणि महिला उमेदवारांसाठी ३ पदांचा समावेश आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल.
या पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ५५% गुणांसह कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. सोबतच उमेदवारांनी बार काउन्सिल ऑफ इंडिया / राज्यात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
या पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे वय कमीतकमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमानात सूट देण्यात आली आहे. विस्तृत माहितीकरिता उमेदवार अधिकृत सूचना तपासू शकतात.
१. भारताचे नागरिक, २. नेपाळचे नागरिक, ३. पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे या पूर्व आफ्रिकन देशांतील आणि इथिओपिया, व्हिएतनाम या देशातील भारतीय वंशाच्या व्यक्ती ज्या भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने आले आहेत, केवळ असे उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.