‘भाग्ययोगा’ची दीक्षा…!

Initiation of 'bhagyoga'...!
Initiation of 'bhagyoga'...!

लेखक संदीप काळे (पत्रकार)

मी परवा सांगलीत होतो. सकाळी सकाळी मला एक फोन आला. नमस्कार दादा, मी संगीता जाधव, सातारा येथून बोलते. मी तुमचे पेपरमधील लिखाण, अनेक पुस्तके वाचली आहेत. तुमचे मला आवडणारे पुस्तक ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकावर चित्रपट येतोय म्हणून तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला. मी म्हणालो, आभारी आहे. तिच्या बोलण्यातून तिच्याविषयीचे अनेक पेलू मला ती सांगत होती. तिचा विषय गंभीर असल्यामुळे मलाही ते ऐकावेसे वाटत होते. मी दोन दिवसांनी साताऱ्यात आहे, भेटू या असे म्हणत मी फोन ठेवला. मी साताऱ्यात गेलो. संगीताने मला तिच्या घरी नेले. छोट्या मोडक्यातोडक्या घरी ती राहत होती. संगीता मूळची परभणीची. तिचे वडील आजारातून गेले. तिच्या तीन बहिणी, आजारी आई घेऊन संगीता तिच्या आईच्या वडिलांकडे साताऱ्याला राहते. खूप वेळ बोलल्यावर त्या कुटुंबाची माहिती माझ्यापुढे आली. संगीताचे वडील ड्रायव्हर होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते मरण पावले. या कुटुंबाला कुणाचाही आधार नव्हता. आईच्या सततच्या आजारामुळे या कुटुंबाला काय करावे कळत नव्हते. एका नातेवाईकाकडून संगीताला सामाजिक कार्य करणाऱ्या एका तरुणाची माहिती मिळाली. आज संगीता, सर्व बहिणींचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी लागणारा खर्च तो तरुण देतो. त्या तरुणाबाबत संगीता आणि तिच्या बहिणींकडून मी खूप किस्से ऐकले. संगीताची आई डोळ्यात आलेले अश्रू पुसत सांगत होती- तो तरुण देवासारखा धावून आला, त्यामुळे आमचे कुटुंब सावरले.

त्या तरुणांनी निराधार असलेल्या शेकडो परिवारांना, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मदत केली. हे मदतीचे कार्य आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. संगीताच्या अनेक मैत्रिणी त्या तरुणाची मदत घेऊन आपल्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी धडपडत आहेत असे संगीता आणि तिच्या बहिणी मला सांगत होत्या.
संगीता मला ज्या मदत करणाऱ्या तरुणांविषयी सांगत होती, त्याचे नाव डॉ. धर्मवीर योगीराज भारती (९५४५५५११११) ते मूळचे परळीमधल्या विद्यानगरचे. लातूरलाही त्यांचे घर आहे. सामाजिक, व्यावसायिक कामानिमिताने त्यांचे राज्यभर भ्रमण सुरू असते. लातूर, औरंगाबादसह पुण्यातही त्यांचे एफसी रोड या भागात कार्यालय आहे, जिथून त्यांचे सामाजिक काम चालते.

संगीता आणि तिच्या कुटुंबावर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये, पण त्या परिस्थतीत धर्मवीर भारती धावून आले आणि वाईटपणाच्या खाईमध्ये चाललेले त्यांचे आयुष्य सावरले. संगीताने माझे आणि धर्मवीर यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. तुम्हाला भेटायचे अशी विनंती मी धर्मवीर यांना केली, त्यांनीही भेटीसाठी होकार दिला. मी सातारा येथून निघालो. काय काय माणसे आपल्या आजूबाजूला असतात आणि ती लोकांसाठी किती करतात असा प्रश्न मला पडला होता. मी मराठवाडा दौऱ्यावर असताना परळी येथे धर्मवीर यांना भेटायला गेलो. धर्मवीर यांची भेट झाली. धर्मवीर यांचा एकूण प्रवास आणि त्यांनी लोकांना काही तरी देण्यासाठी घेतलेला जन्म, सारे काही अद्भुत आणि वेगळे होते.

भिक्षा मागून धर्मासाठी, माणुसकीसाठी आयुष्य वेचणाऱ्या गोसावी समाजात असे एखादे रत्न जन्माला आले तर त्याचे नवल काय असेही होतेच. धर्मवीर यांचे वडील योगीराज दतात्रय भारती आणि आई भागीरथी यांच्याकडून मी जेव्हा धर्मवीर यांचा सारा प्रवास ऐकून घेतला तेव्हा वाटले, आपला जन्म लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीच झाला असला पाहिजे. धर्मवीर यांची स्टोरी एका चित्रपटासारखी होती. धर्मवीर यांच्या घरी, त्यांच्या मामाच्या परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथे भिक्षा मागून गुरुधर्म पाळायची प्रथा होती, आजही कायम आहे. दोन्ही कुटुंबीयांना गुरू म्हणून मानणारा मोठा वर्ग आहे.

‘‘माझ्या कुटुंबाने नेहमी देण्याची भूमिका घेतली. अवघा गाव आमच्या घराच्यांपुढे नतमस्तक व्हायचा. माझे आजोबा शिक्षक होते, माझे पहिले गुरू तेच होते. आपण या समाजाचे गुरू आहोत. गुरूची जबाबदारी दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. आपल्याकडे काही ठेवायचे नाही, सर्व लोकांना देऊन टाकायचे. पाच घरी भिक्षा मागायची, मिळेल ते खायचे. आपले काम पीडितांना मदत करणे एवढेच असेल. आपण कितीही मोठे झालो, तरी आपला धर्म आपण सोडायचा नाही. जिथे अश्रू असतील, तिथे आपल्या गुरुपणाचा ठसा उमटवायचा. आपल्याकडे जे काही येते ते लोकांना देण्यासाठी आहे ही आजोबा, आई-वडिलांची शिकवण कायम मनात होती. मी शिकलो, इंजिनिअर झालो, मोठा झालो, चार पैसे आले. त्यातून पीडित लोकांना मदत केली. मी लातूरला आलो तेव्हा पायात एक स्लीपर होती. घराचे भाडे भरले नव्हते म्हणून घरमालकाने मला घराबाहेर काढले. ती रात्र मी माझ्या कुटुंबासह कशी काढली असेल आता कसे सांगू? धर्मवीर आयुष्यात आलेले खाचखळगे मला सांगत होते आणि मी ऐकत होतो.

धर्मवीर केवळ एका गोसावी समाजाचे तारणहार नाही झाले नाहीत, तर राज्यातल्या त्या दुःखितांचे ते तारणहार, मदतगार झाले ज्यांना गरज आहे मदतीची. ज्यांचे शिक्षण, लग्न थांबले आहे, ज्यांच्या घरी चूल पेटत नाही, ज्यांना मोठ्या आजाराने ग्रासले आहे अशांना मदत करण्यासाठी धर्मवीर यांनी ‘निश्चल पुरी फाऊंडेशन’ची सुरुवात केली. मागच्या पाच वर्षांत २२ हजार मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या अनेक तरुण-तरुणींचे पालकत्व धर्मवीर यांनी स्वीकारले. संगीतासारख्या अनेकजणी धर्मवीर यांना आपला भाऊ मानतात. राखी पौर्णिमा, भाऊबीजेला धर्मवीर गुरूला वंदन करण्यासाठी मोठी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये जास्त समावेश असतो तो त्या बहिणींचा, ज्यांच्या आयुष्यातला धर्मवीर मुळे अंधार दूर झाला.

आमचे बोलणे सुरू होते. वॉचमनच्या मुलाने गोव्यात हॉटेल सुरू केले, इस्त्रीवाल्याचा मुलगा परदेशात डॉक्टर आहे. भांडेवाल्याच्या मुलीचा इंजिनिअरनिंगला नंबर लागला. अशी दहावीस नाही, धर्मवीर यांनी मदत केलेली अनेक उदाहरणे त्यांच्या बोलण्यातून पुढे आली. त्यांनी अनेकांशी माझे बोलणे करून दिले. त्यांनी केलेल्या कामाची माहिती मी अनेक बातम्या, फोटो, उपक्रम पाहून घेत होतो. एवढे काम एक झपाटलेला तरुण करू शकतो. बोलता बोलता एक विषय पुढे आला तो म्हणजे ‘निश्चल पुरी’ फाऊंडेशनचे ‘निश्चल पुरी’ कोण आहेत? त्यांनी हेच नाव का दिले? धर्मवीर मला बोलताना सांगत होते, निश्चल पुरी यांनी २४ सप्टेंबर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक केला. म्हणून निश्चल पुरी हे नाव ठरले. दरवर्षी २४ सप्टेंबरला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो.

धर्मवीर, त्यांचे आई-वडील, निश्चल पुरी फाऊंडेशनचे सचिव अनिल पुरी (८९०८४९११११) आणि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत होतो. धर्मवीर यांच्या पत्नी सुरेखा आणि मुले श्रुती, श्रेयस शालेय मुलांना देण्याची किट तयार करत होते. एका बॅगेत वही, पेन, पुस्तक आणि अन्य साहित्य टाकण्याचे काम सुरू होते. दरवर्षी धर्मवीर यांच्या आईच्या वाढदिवशी श्रुती, श्रेयस अनेक मागास वस्तीमध्ये जाऊन या शालेय साहित्याचे वाटप करीत असतात. श्रुती, श्रेयस दोघेही सांगत होते, आम्ही पहिल्यांदा जेव्हा आजीला वाढदिवशी भेट दिली तेव्हा आजीने सांगितले, मला आनंदी, समाधानी पाहायचे असेल तर माझ्यासमोर अनेकांना आनंदी करा. तेव्हापासून आम्ही दरवर्षी आजीच्या वाढदिवशी शालेय साहित्यवाटप करायचे काम करतो.

धर्मवीर यांच्या मुलांच्या कामातून पुढच्या पिढीकडे सामाजिक वारसा जातोय हे दिसत होते. मी जेव्हा धर्मवीर भारती यांच्या पत्नी सुरेखा यांच्याशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी महिलांसाठी उभे केलेले काम, दरवर्षी राबवत असलेले अनेक उपक्रम मी समजून घेत होतो. आई-बाबा हे सगळ्या उपक्रमांत सहभागी होतात. ज्या गोसावी समाजासाठी प्रमुख्याने धर्मवीर यांनी सुरुवातीला हे काम सुरू केले होते, पुढे त्यांच्या लक्षात आले, की केवळ गोसावी समाजापुरते हे काम करून चालणार नाही, तर पीडित असणाऱ्या प्रत्येक घटकांना मदत मिळाली पाहिजे. याच विचारांतून धर्मवीर यांनी राज्यभरात सर्व ठिकाणी त्यांची सामाजिक टीम उभी केली. त्या टीमच्या माध्यमातून जिथे जिथे अनाथ आहेत, तिथे पोहचण्याचे काम केले आहे. धर्मवीर मला गोसावी समाजाला घेऊन खूप चिंतेत दिसत होते. ते मला बोलता बोलता म्हणाले, गोसावी समाज अजूनही जगापासून फार दूर आहे. आजही पन्नास टक्के समाज भिक्षा मागून जगतोय. मुख्य प्रवाहात हा समाज यावा यासाठी फार कुणी पुढाकार घेत नाही. आमच्या गप्पा सुरू असताना गुरुवर्य प्रा. सुरेश पुरी सर यांचा फोन आला. मी त्यांना धर्मवीर यांच्याविषयी सांगितले. त्यांनी मला धर्मवीर यांच्या अनेक उपक्रमांत मी सहभाग नोंदवला असे सांगितले. पुरी सरांचे धर्मवीर यांच्याविषयीचे गुणगान ऐकून मलाही आनंद वाटला.

धर्मवीरच्या आई खूप भावनिक. गावकुसात वाढणारा एखादा युवक शहरात जेव्हा येतो, तेव्हा त्याला किती काळजी घ्यावी लागते हे त्या सांगत होत्या. त्यांना धर्मवीर सतत बाहेर असतात याची काळजीही वाटते. शेवटी ती आईच ना…! धर्मवीर यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचे आई-वडील यांच्या भोवती फिरते, त्यांच्यावर खूप श्रद्धा. आई भागीरथी, वडील योगीराज या दोघांच्या संस्कारांतून इतरांच्या आयुष्यात चांगले ‘भाग्ययोग’ घडावेत यासाठी असणारी धर्मवीर यांची धडपड नव्या पिढीसाठी खूप महत्त्वाची आहे. धर्मवीर यांच्या घरी नातेवाईकांत भिक्षा मागण्याची प्रथा आजही आहे. ‘‘मागतात ती भिक्षा आणि देतात ती दीक्षा.’’ समाजाच्या उन्नतीसाठी ही ‘दीक्षा’ देण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणावर धर्मवीर आणि त्यांची टीम, त्यांचे फाऊंडेशन मोठ्या प्रमाणावर करीत होते. मागेल त्याला मदत आणि गरजू असल्याचे शोध घेऊन त्याला सतत होणारी मदत असे काम येथे घडत होते. दरवर्षी चार हजारांच्या वर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने करणे हे सोपे नाहीच. आमचे बोलणे रंगात आले होते, मी आता काही वेळात निघणार तितक्यात धर्मवीर यांची मुलगी श्रुती स्वतः नाश्ता बनवून घेऊन आल्या. श्रुती सध्या वैद्यकीय शिक्षण घेतात, त्यांना मी विचारले तुम्ही पुढे कुठे सेवा देणार त्या क्षणात म्हणाल्या, जिथे आसपास दवाखाना नाही, आदिवासी सीमावर्ती भाग आहे, तिथे दवाखाना टाकून गरिबांना मोफत शिक्षण द्यायचे. मी श्रुतीच्या चेहऱ्याकडे पाहून एकदम शांत बसलो.

धर्मवीर यांच्या आई वडिलांच्या पायावर डोके ठेवत मी त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो. माझ्या मनात विचार चालला होता. काही संस्कार जिन्समधून येतात, आई-वडील आजोबा यांच्याकडून येतात. आपला जन्म इतरांना देण्यासाठी झाला आहे हा विचार मनात घेऊन जो काम करतो तो खरा ‘धर्मवीर’ धर्माचे रक्षन करणारा असतो. त्यांच्या आयुष्याचा सुगंध सर्व ठिकाणी पसरतोय. माणुसकी ज्यांना राखता येते तोच खरा धर्म, हेच धर्मवीर यांनी त्यांच्या कामातून सांगितले आहे. चला तर मग आपण सारेही धर्मवीर होवू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here