पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस भरती घोटाळ्यासंदर्भात पोलीस महासंचालकांशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची फोनवरून चर्चा

Investigate the police recruitment process through an independent mechanism and take action against the culprits
Investigate the police recruitment process through an independent mechanism and take action against the culprits

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात राज्यातील विविध भागातून आलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षकार्यालय टिळक भवन येथे भेट घेऊन या परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सर्व प्रकार त्यांना सांगितला व कारवाई करण्याची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले आहे.

या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेत जास्त मार्क असलेल्यांना वगळून कमी मार्क्स मिळालेल्या मुलांना भऱती करून घेण्यात आले आहे. शारिरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले, शारिरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील मुला-मुलांनी आमच्याकडे केल्या आहेत.

पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या गंभीर आहेत. या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी व त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करावी. मुला मुलींच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे म्हणून  मुंबईत पार पडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन परिक्षा पुन्हा व पारदर्शक पद्धतीने घ्यावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here