औरंगाबाद : इंटरनेटवरील माहितीच्या आधारे जुगाड करून विद्यार्थी अशा काही गोष्टी बनवतात, जे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक प्रयोग औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये शिकत असलेल्या सतीश मुंडे या विद्यार्थ्याने केला आहे. जुन्या कारच्या उरलेले साहित्यातून सतीश हेलिकॉप्टर बनवित आहे. अंतिम टप्प्यात असलेले हे हेलिकॉप्टर पाहिल्यानंतर त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. सतीश भास्कर मुंडे (Satish Bhaskar Munde) याने यंदा बारावी पूर्ण करून शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेतला आहे. परळी वैजनाथ (जि. बीड) हे त्याचे मूळ गाव.
सतीशला अभियांत्रिकीला जाण्याची इच्छा होती; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण न घेताही काहीतरी हटके करून दाखवायचे सतीशने ठरवले. त्यासाठी त्याने हेलिकॉप्टर बनवण्यास सुरुवात केली. पण प्रश्न होता तो पैशाचा. हेलिकॉप्टर बनवायचं म्हणजे खूप पैसा लागणार होता, हेलिकॉप्टर बनविण्यासाठी सतीशने शिक्षण सोडून वाळूज एमआयडीसीत जॉब करायला सुरुवात केली. जिद्द न सोडता तब्बल तीन वर्षे कंपनीत जॉब करून तीन लाख रुपये खर्च करून तो हेलिकॉप्टर तयार करतोय.
आर्थिक परिस्थितीवर मात
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक; परंतु इच्छा तिथे मार्ग नक्कीच मिळतो. सतीशने कोणाकडेही हात न पसरवता, मोठ्या जिद्दीने पैसे कमवून हेलिकॉप्टर बनवण्याची इच्छा पूर्ण केली. अनेक तरुणांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे.
दहावीतदेखील केला होता प्रयोग
सतीशने इयत्ता दहावी पूर्ण केल्यानंतर लहान आकाराचे दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करून हेलिकॉप्टर बनविले होते. परंतु त्यावेळी त्याच्या मनात आले की मोठे हेलिकॉप्टर बनवावे; परंतु आता मोठे हेलिकॉप्टर बनविण्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे? सतीशचे वडील एका कंपनीत नोकरी करतात. आई गृहिणी आहे. त्यामुळे मोठे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी स्वतः मेहनत घ्यावी लागणार हे निश्चित होते. कंपनीत जॉब करून त्यातून मिळालेल्या पैशांतून सतीशने आज एक व्यक्ती बसू शकेल एवढ्या मोठ्या आकाराचे हेलिकॉप्टर तयार केले. त्यासाठी सतीशला आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला. हेलिकॉप्टर बनविण्यासाठी सतीशने इंटरनेटचा आधार घेतला आहे. सध्या हे हेलिकॉप्टर अंतिम टप्प्यात आहे. अजूनही दोन ते अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याचे सतीश मुंडे याने सांगितले.
लोकप्रतिनिधींकडून दखल
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता विभागातर्फे ता. १७ व १८ सप्टेंबररोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कौशल्य रोजगार मेळावा सुरू. या मेळाव्यात सतीशने आपले हेलिकॉप्टर ठेवले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित उद्योजक, लोकप्रतिनिधींनी सतीशने तयार केलेल्या हेलिकॉप्टरचे कौतुक केले. तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, असे सतीशने सांगितले.