उत्तर प्रदेशात काँग्रेसला धक्का; राष्ट्रीय लोक दल पक्षाचा ‘इंडिया’ला रामराम, भाजपाशी युती

रालोद एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. दरम्यान, जयंत चौधरी यांनी आज (१२ फेब्रुवारी) पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी एनडीएत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

jayant-chaudhary-rld-chief-officially-confirms-joining-nda-left-alliance-setback-for-congress-news-marathi-update-today
jayant-chaudhary-rld-chief-officially-confirms-joining-nda-left-alliance-setback-for-congress-news-marathi-update-today

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीला रामराम केला आहे. चौधरी यांनी आपण आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांच्या पक्षाने एनडीएत (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच उत्तर प्रदेशात काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 

रालोद एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. दरम्यान, जयंत चौधरी यांनी आज (१२ फेब्रुवारी) पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी एनडीएत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, रालोदचे आमदार एनडीएत सहभागी होण्याच्या विरोधात आहेत, असे दावे काही वृत्तवाहिन्यांनी केले होते. त्यावर चौधरी म्हणाले, मी आमच्या सर्व नेत्यांशी, आमदारांची चर्चा केली आहे. सर्व आमदार आमच्या या निर्णयाच्या बाजूनेच आहेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (९ फेब्रुवारी) जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न दिला जाणार असल्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर रालोद प्रमुख जयंत चौधरी भावूक झाले. या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच त्यांना सपा-काँग्रेसबरोबरची युती तोडून भाजपाबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?

दरम्यान, एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर जयंत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आमचे आमदार आणि नेत्यांमधील नाराजीच्या बातम्या केवळ वृत्तवाहिन्यांवर पाहायला मिळत आहेत. मला वाटत नाही की कुठल्याही वृत्तवाहिनीने आमच्या नेत्यांशी बातचीत केली असेल. आम्ही सर्वांशी बोलूनच हा निर्णय घेतला आहे. आम्हाला खूप कमी कालावधीत हा निर्णय घ्यावा लागला आहे. फार वेळ घेण्यासारखी परिस्थिती आमच्यासमोर नव्हती. आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे.

 इंडिया आघाडीतले पक्ष सातत्याने दावा करत होते की, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल हा पक्ष त्यांच्या आघाडीचाच एक भाग आहे. जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. आम्ही सर्व पक्ष मिळून आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत, परंतु, आघाडीतल्या नेत्यांचे सर्व दावे आता खोटे ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here