
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील (jayant patil) आज सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले, तर अन्य कार्यकर्ते सर्वत्र आंदोलन करत आहेत. शहरात क्रांतीचौकात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर ईडी आणि भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है. अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन, जिल्हाध्यक्ष माजी आ.कैलास पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील, कार्याध्यक्ष मनोज घोडके, कार्याध्यक्ष कय्युम अहेमद यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
किराडपुरा दंगल, खारघरमधील मृत्यू प्रकरणी विचारला जाब…
किराडपुरा दंगलीतील सुत्रधार कोण आहे. तसेच खारघरमधील नवी मुंबईतील खारघरमध्ये १६ एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान, तब्बल १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असेही बॅनर आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले.