कोल्हापूर l काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी सुरू केलं आहे. यातच त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्यावर गैरव्यवहाराचे आणखी काही आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जाता? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असं म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही काम करा तुमचं, तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करु द्या. तुम्ही बदनामी का करत आहेत?
ते पुढे म्हणाले, आमच्यावरआत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचं नाव का घेतायत? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेतायत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे.