मुंबई l उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी घडलेल्या हिंसाचारानंतर (Lakhimpur kheri violence) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केलीय. आज उत्तर प्रदेशमध्ये जे सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपाचं (BJP) अधिकृत धोरण आहे का?, असं राऊत य़ांनी सत्ताधाऱ्यांना विचारलं आहे. इतकच नाही तर राऊत यांनी मोदी सरकारची तुलना ब्रिटीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. तसेच घटनस्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. “विरोधी पक्षाला तिथे जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही आहे?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय.
फडणवीसांना टोला
संजय राऊत हे कागदावरचे नेते आहेत. एसी ऑफीसमध्ये बसून लिहिणाऱ्यांना शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार अशी टीका करणारे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी यावेळी उत्तर दिलं. “ते शेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला गेलेले की नांदेडमध्ये शिवसेनेच्या माजी खासदाराला पक्षात घेण्यासाठी गेले होते का? काल आमचा माणूस घेतला तो ही रडका. दुसऱ्यांची लोक घ्यायची आणि निवडणुका लढवायच्या हे फार काळ चालत नाही,” असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
राजकीय पडसाद…
या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.
काय घडले?
केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला.
आज देशभर निदर्शने
लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.