लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी (Lakhimpur Kheri Violence) पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आशिष मिश्राला शनिवारी (9 ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेतलं होतं. त्याची जवळपास 12 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला अटक केली आहे.
सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती दिली. “अनेक तासांपासून सुरु असलेल्या चौकशीत आशिष मिश्राने सहकार्य केलं नाही. तो अनेक गोष्टी सांगू इच्छित नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल”, अशी माहिती उपेंद्र यादव यांनी दिली आहे. पोलिसांनी आशिष मिश्राला खून, गुन्हेगारी कट, बेपर्वा ड्रायव्हिंगची कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय.
मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. ह्या घटनेनंतर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली. आधी आंदोलकांनी दगडफेक केली की आधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली यावर आरोप प्रत्यारोप आता सुरु झालेत. पण ह्या घटनेमुळे योगी सरकारला संकटात टाकल्याचं दिसतंय.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आशीष मिश्राने याबाबत आधीच सांगितलं आहे की, तो घटनास्थळी गेलाच नाही. ज्या ठिकाणी दंगल म्हणजे पैलवानांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच शाळेत तो संपूर्णवेळ उपस्थित होता. कार्यक्रमाची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण कुठेही गेलो नाही, वाटलंस तर इतरांना विचारा असंही आशीष मिश्रा सांगतो आहे. आशीष मिश्राच्या नावावर असलेली थार जीप, लाखीमपूरमध्ये कशी पोहचली असं विचारल्यावर आशीष म्हणतो की, पाहुण्यांना घेण्यासाठी माझ्या जीपने काही कार्यकर्ते गेले होते, पण त्या कार्यकर्त्यांमध्ये मी नव्हतो.