नवी दिल्ली : भारताच्या दिवंगत जलतरणपटू (indian-swimmer) आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पद्मश्री आरती साहा (Arati saha) यांचा गुगलने आज (२४ सप्टेंबर) डुडलच्या माध्यमातून गौरव केला आहे. इंग्लीश खाडी पोहून जाण्याचा विक्रम पहिल्या भारतीय महिला आरती साहा यांच्या नावाची नोंद आहे.
गुगलने एका भारतीय महिलेचा या डुडलच्या माध्यमातून सन्मान करण्यात आलाय. आज आरती जिवंत असत्या तर त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा करत असत्या.
आरती यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लीश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांनी फ्रान्समधील केप ग्रिझ नॅझ ते इंग्लंडमधील सॅण्डगेटदरम्यानचे ४२ मैलांचे अंतर पोहून पार केलं.
या पराक्रमानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपण भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सांगितलं होतं.
आरती साहा यांच्याबद्दल
कोलकात्यामधील बंगली कुटुंबामध्ये आरती यांचा जन्म झाला. आरती यांना दोन भावंडे होते. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले सुर्वण पदक वयाच्या पाचव्या वर्षीच जिंकलं.
११ व्या वर्षांपर्यंत आरती या जलतरणपटू म्हणून उदयास आल्या. लहान वयामध्ये त्यांनी या क्षेत्रात बरेच नाव कमावले. इंग्लीश खाडी पोहून जाण्याचा विक्रम पहिल्या भारतीय महिला आरती साहा यांच्या नावाची नोंद आहे.
आरती आणि अरुण यांना अर्चना नावाची एक मुलगी होती. आरती यांनी नंतर रेल्वेमध्ये काम केलं. १९९४ साली ४ ऑगस्ट रोजी आरती यांचा मृत्यू झाला.
डुडलवरील चित्र कोलकात्यामधील कलाकार लावंण्या नायडू यांनी रेखाटले
गुगलच्या होमपेजवर झळकणारे आजच्या डुडलवरील चित्र हे कोलकात्यामधील कलाकार लावंण्या नायडू यांनी काढले आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मोठी स्वप्न पाहणाऱ्यांना हे चित्र प्रेरणा देईल अशी अपेक्षा लावंण्या यांनी व्यक्त केली आहे.
जलतरणपटू म्हणून लहान वयामध्येच आरती यांनी अनेक सन्मान मिळवले. यामध्ये १९४९ साली भारतातील सर्वात वेगवान जलतरणपटू म्हणून नाव नोंदवणे, १९५१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये डॉली नाझीर यांचे सर्व विक्रम मोडीत काढणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
१९५१ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये आरती आणि डॉली दोघीही होत्या. या ऑलिम्पिकमध्ये एकूण चार महिला स्पर्धक होत्या त्यापैकी दोन भारतीय होत्या.
ऑलिम्पिकनंतर आरती यांनी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारावर लक्ष केंद्रित केलं. गंगा नदीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या जलतरण स्पर्धांमध्येही आरती सहभागी होऊ लागल्या.
१९५२ साली बांगलादेशमधील जलतरणपटू ब्रोजेन दास यांनी इंग्लीश खाडी पोहून पार करत अशाप्रकारचा विक्रम करणारा पहिला आशियाई जलतरणपटू होण्याचा मान मिळवला तेव्हा आरती यांनी त्यांचे अभिनंदन केलं होतं.
त्यावेळी दास यांनी आरतीला १९५३ साली आयोजित करण्यात आलेल्या बुटलीन इंटरनॅशनल क्रॉस चॅनेल स्विमिंग रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. एवढी लोकप्रियता आणि यश मिळवल्यानंतरही या स्पर्धेसाठी इंग्लंडला जायला पैसे उभारण्यात आरती यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आरतीला पाठिंबा देत सरकारच्या माध्यमातून तिला मदत केली. आरती या कठोर परिश्रम घेण्यासाठी आणि अनेक तास सराव करण्यासाठी ओळखल्या जायच्या.
एकदा तर त्यांना देशबंधू पार्कमधील तलावात सलग आठ तास पोहण्याचा सराव केला होता. त्यानंतर त्यांनी एकदा १५ तास पोहण्याचाही सराव केला होता. जवळजवळ सहा वर्ष सराव केल्यानंतर त्या २४ जुलै १९५९ रोजी इंग्लंडला पोहचल्या.
इंग्लीश खाडी पोहण्याच्या पहिल्याच प्रयत्न विघ्न आलं. आरती यांची पायलेट बोट तासभर उशीरा आल्याने त्यांना उशीरा सुरुवात करावी लागली.
मात्र सुमद्रातील नैसर्गिक परिस्थिती तोपर्यंत बरीच बदलली होती. त्यामुळे त्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी पाच मैलांनंतर माघार घ्यावी लागली.

२९ सप्टेंबर १९५९ मध्ये इंग्लीश खाडी पोहून जाण्याच्या आपल्या दुसऱ्या प्रयत्नात आरती यशस्वी ठरल्या. त्यांनी सलग १६ तास २० मिनिटांच्या कालावधीमध्ये ४२ मैलांचे अंतर पार करत इंग्लीश खाडी यशस्वीपणे पार केली. इंग्लंडच्या किनाऱ्यावर पोहचल्यानंतर त्यांनी तेथे भारतीय झेंडाही फडकावला.
आरती यांनी या पराक्रमानंतर आपले मॅनेजर असणाऱ्या डॉक्टर अरुण गुप्ता यांच्याबरोबर १९५९ मध्ये लग्न केलं. पुढील वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. १९९९ साली आरती यांच्या सन्मानार्थ पोस्टाने तिकीटही जारी केलं होतं.
लहानपणापासून पोस्टाची तिकीट जमा करण्याचा होता छंद
गुगलवर ज्या नायडू यांनी काढलेले चित्र आज आरती यांच्या जयंतीनिमित्त झळत आहे त्यांना लहानपणापासून पोस्टाची तिकीट जमा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे आरती यांचा फोटो असणारे तिकिटही आहे.