LPG Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ!

Commercial LPG Price Increased : देशभरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

lpg-price-hike-19-kg-commercial-gas-cylinder-price-increased-by-rs-209-check-latest-rates-mumbai-delhi-news-update-today
lpg-price-hike-19-kg-commercial-gas-cylinder-price-increased-by-rs-209-check-latest-rates-mumbai-delhi-news-update-today

नवी दिल्ली: महागाईच्या दणक्याने ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. ऑईल मार्केटिग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली असून त्याअंतर्गत १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर २०९ रुपयांनी महागला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किंमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

दरम्यान, २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलेंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 सप्टेंबरमध्ये सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर याच १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची १,५२२ रुपयांमध्ये विक्री केली जात होती. आता यात २०९ रुपयांची वाढ झाल्यानंतर याच सिलेंडरसाठी १,७३१ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात या सिलेंडरची १,६३६ रुपयांमध्ये विक्री होईल, तर चेन्नईत याच सिलेंडरसाठी १,८९८ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १,४८२ रुपयांवरून १,६८४ रुपये इतकी करण्यात आली आहे.

 केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी देशातील सामान्य जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देत १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात केली होती. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५० ते १५७ (वेगवेगळ्या शहरांमध्ये) रुपयांची कपात केली होती. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपये झाली होती. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १६३५ रुपयांवरून १४८२ रुपये इतकी कमी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here