Mahaparinirvan Din: चैत्यभूमीवर येण्याचे टाळा, बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन!

prakash-ambedkar-vanchit-bahujan-aghadi-ask-mva-lok-sabha-seat-sharing-formula-for-maharashtra-news-update-today
prakash-ambedkar-vanchit-bahujan-aghadi-ask-mva-lok-sabha-seat-sharing-formula-for-maharashtra-news-update-today

मुंबई: महापरिनिर्वाण दिनी (Mahaparinirvan Din) चैत्यभूमीवर (chaitya bhoomi) जाणारच, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर (Anand Ambedkar) यांनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र महापरिनिर्वाण दिनी मुंबईत न येण्याचं आवाहन आंबेडकरी जनतेला केलं आहे. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा. चैत्यभूमीवर येणं टाळा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही? अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल कुणालाच अंदाज येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे. शासनाचे नियम पाळा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आपल्याच उमेदवारांना मतदान करा

महापरिनिर्वाण दिनी सर्वांनी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आनंदराज आंबेडकर काय म्हणाले होते?

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला चैत्यभूमीवर येण्याचं आवाहन करतानाच सरकारचे आवाहन धुडकावून लावले होते. आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या सोमवारी 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, असं आनंदराज म्हणाले होते.

सर्व सण, उत्सव, राजकीय पक्षांचे सारे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले असून ते सुरळीत पार पडत आहेत. मग बौद्ध जनतेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात? असा सवाल आनंदराज यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्य सरकारने घरात बसून बाबासाहेबांना अभिवादन करावे असे फक्त आवाहन केले आहे. पण आंबेडकरी समाज हा बंदी- मज्जावाला कधीही जुमानत नाही, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

महापौरांसोबत बैठक

दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीबाबत चर्चा केली. 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिना निमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर आपण एक बैठक घेतली होती. या बैठकीत सगळेच प्रतिनिधी उपस्थित होते. आपण दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाचं उत्तम नियोजन करत असतो. यंदाही सर्वांना चैत्यभूमीवर दर्शन मिळेल. त्यासाठी रांगा लागतील. शौचालय व्यवस्था, शेडची व्यवस्था, फुलं, सुरांचं अभिवादन असं सगळं नेहमी प्रमाणे असेल. सगळ्यांना दर्शन दिले जाईल. पण ओमिक्रोनचं भान ठेऊन दर्शन मिळेल. कोरोनाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here