मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत..; शिवसेनेचा हल्लाबोल

maharashtra-cm-eknath-shinde-will-do-bjp-campaign-for-four-states-uddhav-thackeray-group-criticizes-news-update-today
uddhav-thackeray-criticized-shinde-fadnavis-government-over-barsu-refinery-project-news-update-today

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भाजपच्या प्राचारासाठी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सामनातून शिंदेंवर सडकून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचारात उतरले आहेत त्यांची आखरी मंजिल तीच आहे, अशी टोलेबाजी करण्यात आली आहे.

Cm एकनाथ शिंदेंवर निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राजकारण ३१ डिसेंबरनंतर संपणार आहे. सत्तेचा डोलारा टिकवता येणार नाही याची खात्री पटल्यानं त्यांची मनस्थिती ऐन दिवाळीत बिघडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक टोळधाडी आल्या अन् नामशेष झाल्या. त्यामुळेच आता शिंदे भाजपसाठी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार करणार आहेत.

पण हेच लोक मुंबई, ठाण्यासह राज्यातील १४ महापालिका निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. मुळात बाळासाहेब ठाकरेंची भूमिकाच त्यांना समजली नाही म्हणून ते भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत.

 बाळासाहेबांचा विचार कळलाच नाही

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे हे एनडीएत होते पण त्यांनी इतर राज्यांत जाऊन भाजपच्या पालख्या वाहिल्या नाहीत. पण आज सगळाच नकली माल प्राचारासाठी निघाला आहे. महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतिय भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यापेक्षा ते थेट भाजपत का जात नाहीत? असा सवालही यावेळी सामनातून विचारण्यात आला आहे.

 अल्लाबक्षच्या भूमिकेत

“प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकातील तळीरामानं जी दारुबाजांची संस्था निर्माण केली. त्यातील शास्त्रीबुवा आणि अल्लाबक्ष यांच्यातील वैचारिक वाद नशेमुळं उफाळून येतो, आणि एकमेकांची उलट बाजू घेऊन भांडतात. यातील अल्लाबक्षच्या भूमिकेत सध्या मुख्यमंत्री शिंदे वावरत आहेत. तसेच भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत”, असंही यात म्हटलं आहे. 

 अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांमुळं मनःशांती निघाले

शिंदेंच्या टोळीतील गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप-प्रत्यारोप केले. या दोघांमधील भांडण इतक्या टोकाला पोहोचले आहे की, त्यापासून मनःशांतीसाठी मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या प्रचाराला निघाले आहेत.

यामुळं शिंदेंच्या टोळीचा डीएनए समोर आला आहे. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही, हे त्यांना समजलं हे बरंच झालं, अशा कठोर शब्दांत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लबोल करण्यात आला आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here