
मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन (Maharashtra Omicron Cases) बाधितांची संख्या 88 वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात 23 नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत (Mumbai Corona Update) ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 600 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 1 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची (Task Force) तातडीची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या बैठकीत नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यावर देखील चर्चा झाली. राज्य सरकार आज शुक्रवारी नवी नियमावली जाहीर करणार आहे.
ओमिक्रॉनचं संकट, कोरोना रुग्णांची वाढ
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मुंबईत मंगळवारी 327 रुग्ण आढळून आले होते. तर, गुरुवारी 602 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, महाराष्ट्रात 1179 रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळं राज्य सरकार सतर्क झालं असून राज्यामध्ये नवी नियमावाली लागू करण्यात येईल.
गर्दी रोखण्यासाठी नवी नियमावली
आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, याबाबत राज्य सरकार विचार करत आहेत. विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आज नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. .
टास्क फोर्सच्या बैठकीत इतर राज्यांच्या नियमावलीवर चर्चा
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्ससोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.