“मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

maharashtra-Uddhav-thackeray-Devendra-fadnavis-rain-energy-minister-nitin-raut-announce-relief-from-light-bill-to-flood-affected-news-update
maharashtra-Uddhav-thackeray-Devendra-fadnavis-rain-energy-minister-nitin-raut-announce-relief-from-light-bill-to-flood-affected-news-update

कोल्हापूर l कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली होती. त्यावर बोलताना “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं.

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे.

पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत.

लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे”. दरम्यान नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पावसामुळे आणि पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केलं जावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी लगेचच टोला लगावला. “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत.

मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहेत. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here