मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra MLS Winter Session) आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित असतील. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर देखील बहिष्कार टाकला होता. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून सरकार पाडून दाखवा,असे आव्हान अजित पवार यांनी विरोधी पक्षाला दिले आहे.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील आज पार पाडली जाईल.
विधानसभा अध्यक्षाची निवड
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानं हे पद रिक्त आहे. गेल्या अधिवेशनाचं कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं. तर, काँग्रेस देखील या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण उमेदवार असेल हे मात्र, काँग्रेसनं स्पष्ट केलेलं नाही. आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन भाजपनं ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडलं आहे.
विरोधक ठाकरे सरकारला घेरणार?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन, विधानसभा अध्यक्षांची आवाजी पद्धतीनं निवड, ओबीसी राजकीय आरक्षण, महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वीज बिल वसुली, पेट्रोल डिझेलवरील कर कमी न करणं, दारुवरील कर कमी करणं, महिला सुरक्षा, कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळं आज विधिमंडळात भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
अविश्वास ठराव आणा, अजित पवारांचं चॅलेंज
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत त्यांना आव्हान दिलं आहे. भाजपला जर सरकारकडे आमदारांचं पाठबळ नाही असं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणावा, आम्ही विश्वासाचा ठराव जिंकू असं उत्तर दिलं. विधानसबा अध्यक्षांची निवडणूक आहे म्हटल्यावर विरोधक असायलाच हवा, असं म्हणत त्यांनी भाजपला विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, असं आवाहन केलं आहे. ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यवस्था, नोकर भरती, महावितरण या मुद्यांवर सरकार चर्चेला तयार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.