मराठा आंदोलकांवरील लाठीमारामुळे संताप:जालन्यासह उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणीत बंदची हाक; मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक

maratha-reservation-andolan-protesters-jalna-maratha-kranti-morcha-protest-in-maharashtra-live-update-today
maratha-reservation-andolan-protesters-jalna-maratha-kranti-morcha-protest-in-maharashtra-live-update-today

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत असून मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. काही ठिकाणी जाळपोळच्या घटना घडाल्या आहेत. मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

आज मराठा समाजाकडून जालना, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारी रात्री कोल्हापूर व औरंगाबाद आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे.

जालन्यात आज रास्ता रोको, बससेवा पूर्ण ठप्प

जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. भूसार मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई-शेवगाव मार्ग पोलिसांनी बंद केला.

औरंगाबाद जाणारी वाहने शेवगाव मार्गाने वळवण्यात आली. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस डेपोत ठेवल्या असून सोडलेल्या नाहीत. गेवराईतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे बीडचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले.

 बीड : मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंद

गेवराईत शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बीड शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे बैठक झाली व आज शनिवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये बस पेटवली

औरंगाबादेत रात्री 12 वाजता मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर आगाची बस मागून जाळण्यात आली. तर सिडको बसस्थानकात पैठण फलाटावर उभी बस फोडण्यात आली. तसेच, उस्मानाबाद जिल्हा बंदची हाकही आज सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 9 वाजता निषेध नोंदवण्यात येणार आहे.

शरद पवार, संभाजीराजे घेणार आंदोलकांची भेट

मराठा आरक्षणसाठी आंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने 20 आंदोलक जखमी झाले.या आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जालना जिल्ह्यात येणार आहे. तसेच, छत्रपती संभाजीराजेदेखील आज या आंदोलकांशी भेट घेणार आहेत.

हेही वाचा: मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण नाही तर पोलीसांकरवी लाठ्या काठ्यांनी मारले

मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

दरम्यान, जालन्यातील घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाही आता आक्रमक झाला आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराबाबत पुढे काय भूमिका घ्यायची? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा काय? यावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक होत आहे. यासह राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here