औरंगाबाद : शहरातील सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंत एकच उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोमार्फत डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या सादरीकरणानंतर डीपीआरमध्ये सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी सुधारित डीपीआरचे सादरीकरण झाले.
यावेळी शेंद्रा ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्यातील कामासाठी महापालिकेने अनुकूलता दाखवली आहे. आता या डीपीआरचे सादरीकरण मार्च महिन्यात मंत्र्यांसमोर केले जाणार आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अडथळे असल्यामुळे पर्यायी मार्ग शोधण्याची सूचना करण्यात आली असल्याचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल्वेसेवा सुरू करणे, त्यासाठी काँप्रेसिव्ह मोबॅलिटी प्लान तयार व एकच उड्डाणपूल करण्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याचे काम स्मार्ट सिटी अभियानामार्फत महामेट्रोला देण्यात आले आहे. काँप्रेसिव्ह मोबॅलिटी प्लानचे सादरीकरण तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रोने केले होते. त्यावेळी काही सुधारणा सूचविल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी मेट्रो रेल्वे व वाळूज ते शेंद्रापर्यंतच्या अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर केले.
याविषयी माहिती देताना डॉ. चौधरी म्हणाले, की दोन टप्प्यात मेट्रोचे काम केले जाणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वेस्टेशन असा असेल. शेंद्रा-चिकलठाणा-सिडको बसस्थानक चौक-क्रांती चौक-उस्मानपुरा-रेल्वेस्टेशन असा असेल. दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट असे नियोजन आहे. रेल्वेस्टेशन-महावीर चौक-मध्यवर्ती बसस्थानक-ज्युबलीपार्क-रंगीन गेट-जिल्हाधिकारी कार्यालय-दिल्ली गेट- हर्सूल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे.
वारसास्थळे, कार्यालयामुळे वळणे
दुसऱ्या टप्प्यातील मार्गात वारसास्थळे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा अडथळा आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली. या कामाचा व्यवस्थित डीपीआर तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर मार्च महिन्यात या डीपीआरचे सादरीकरण डॉ. कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर केले जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
असे आहेत टप्पे….
>>पहिला टप्पा (शेंद्रा ते रेल्वेस्टेशन) : शेंद्रा-चिकलठाणा-सिडको बसस्थानक चौक-क्रांती चौक-उस्मानपुरा-रेल्वेस्टेशन.
>>दुसऱ्या टप्पा (रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट) : रेल्वेस्टेशन-महावीर चौक-मध्यवर्ती बसस्थानक-ज्युबलीपार्क-रंगीनगेट-जिल्हाधिकारी कार्यालय-दिल्ली गेट- हर्सूल टी पॉइंट.