खोके प्रकरण : बच्चू कडू एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना पाठवणार नोटीस!

राणाच्या आरोपात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वच आरोपी आहे. हा म्हणतो, पैसे घेतले तर मग मला पैसे कुणी दिले. यांनीच दिले असतील ना. पाकिस्तानच्या पंतप्रधानाने तर दिले नसतील. याने सांगावं ते, असं बच्चू कडू म्हणाले.

bachchu-kadu-mocks-eknath-shinde-government-on-cabinet-expansion-news-updat-today
bachchu-kadu-mocks-eknath-shinde-government-on-cabinet-expansion-news-updat-today

मुंबई: भाजप समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. आता हा आरोप कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी या आरोपावरून आता कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस बजावणार आहेत. मला किती खोके दिले हे सांगा, अशी विचारणा ते या नोटिशीतून करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर आमदार बच्चू कडू तातडीने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवणार आहे. तुम्ही किती पैसे दिले हे विचारणार आहे. दिले असेल तर सांगावं, नसेल दिले तर तेही सांगावं. उद्या नोटीस जाणार. वकिलांमार्फत ही नोटीस देणार आहे. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे कायदेशीर केलं पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत नोटीस तयार होईल, असं बच्चू कडू म्हणाले.

मग मला पैसे कुणी दिले…

मी पैसे घेतले असं राणा म्हणतात तर ते दिले कुणी? कुणी दिले? जयललितांनी दिले की मायावतीने दिले? की अखिलेश यादव यांनी दिले. हे पैसे घे आणि शिंदे-फडणवीसांचं सरकार करा असं त्यांनी म्हटलं काय? माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. यांच्या आरोपात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वच आरोपी आहे. हा म्हणतो, पैसे घेतले तर मग मला पैसे कुणी दिले. यांनीच दिले असतील ना. पाकिस्तानच्या पंतप्रधानाने तर दिले नसतील. याने सांगावं ते, असं त्यांनी सांगितलं.

आरपारच्या लढाईला मी तयार…

या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. मी सामोरे जायला तयार आहे. मी कधीही तयार आहे. मला तर आनंद होईल. चौकशी झाली तर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. लागलेला डाग हा कधी तरी पुसला पाहिजे. आरपारच्या लढाईला मी तयार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ती तुझी औलाद…

 हा किराणाच्या वाद नाही. हा खोक्याचा वाद आहे. त्याने धारणीत म्हटलं. परतवाड्याला माझ्या मतदारसंघात येऊन तोच आरोप केला. बाप बेटा ना भैय्या सबसे बडा रुपय्या म्हणाला. बापा पेक्षा आणि भैय्या पेक्षा तुला रुपया मोठा असेल. मला बाप भैय्यापेक्षा रुपया मोठा नाही. ती तुझी औलाद असेल, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here