लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी आजपासून मोबाइल तिकीट अ‍ॅप सेवा

eight-hour-megablock-on-central-railway-Sunday-news-update
eight-hour-megablock-on-central-railway-Sunday-news-update

मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबई उपनगरीय प्रवाशांची तिकीट व पाससाठी स्थानकातील खिडक्यांसमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी बंद असलेली यूटीएस मोबाईल तिकीट अ‍ॅपही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य व पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यासाठी दोन लसमात्रा प्रवाशांसाठी असलेल्या युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी)मोबाइल तिकीट अ‍ॅपची जोड देण्यात आली आहे. बुधवारपासून ही यूटीएस मोबाइल तिकीट अ‍ॅप सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची जोडणी देऊन मोबाइल तिकीट अ‍ॅप सेवा सुरू केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ही सुविधा पश्चिम रेल्वेवरही उपलब्ध असेल. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो.

आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल अ‍ॅपशी जोडले गेले आहे, ज्यामध्ये नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी खिडक्यांवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात, असे मध्य रेल्वेने सांगितले.

मासिक तिकिटांचे नूतनीकरणही शक्य

या अ‍ॅपद्वारे प्रवासी तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही जारी केले जाऊ शकतात. मासिक तिकिटांचे नूतनीकरणही शक्य आहे.  तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होईल. ज्या प्रवाशांनी यापूर्वीच यूटीएस मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केले आहे, त्यांना या नवीन  प्रक्रियेसाठी अ‍ॅप अपडेट करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here