महागाई, बेरोज़गारी, ग़रीबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते सांगा ?; पटोलेंचा दानवेंना सवाल

जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा BJP एकमेव कार्यक्रम आहे.

- modi-government-nana-patole-rahul-gandhi-raosaheb-danve-news-update
- modi-government-nana-patole-rahul-gandhi-raosaheb-danve-news-update

मुंबई l मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा BJP एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी Rahul Gandhi यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने ७ वर्षात महागाई, बेरोज़गारी, ग़रिबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते जनतेला सांगा? असा रोखठोक सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, जनतेला खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आले. मागील सात वर्षात मोदी सरकारने देश रसातळाला घालवला. अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण झाली आहे. जीडीपी घसरला  आहे, पेट्रोल १०० रुपये पार करुन दोनशे रुपयाकडे वाटचाल करत आहे, डिझेल ९६ रुपये लिटर झाले आणि काँग्रेसच्या राजवटीत ४४० रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस ८५० रुपये झाला.

महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.जागतिक पातळीवर भारताची पत घसरली आहे. चीन सीमाभागात अतिक्रमण करत आहे त्यावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाहीत. चीनचे नाव घ्यायलाही मोदींना भीती वाटते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमीभाव देणार अशा वल्गणा केल्या परंतु शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदी सरकारने शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारे काळे कायदे आणले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी लावला जातो. खते, बियाणांच्या किमती भरमसाठ वाढवल्या असून शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम मोदी सरकार करत असून ‘हम दो हमारे दो’चे हे सरकार व त्यांचे मंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. देशातील प्रश्न गंभीर असून सामान्य जनतेचे लक्ष या मुळ मुदद्यावरून दुसरीकडे वळवण्यासाठी दानवेसारखे मंत्री शिवराळ भाषेतून टीका करत आहेत. जनता त्यांच्या या भुलथापांना आता बळी पडणार नाही.

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी तसेच गांधी कुटुंबावर पातळी सोडून टीका करून रावसाहेब दानवे व भाजपाचे नेते त्यांची पातळी दाखवून देतात. त्यांच्यावर झालेले संस्कार यातून दिसतात. त्यांनी त्यांची पातळी सोडली तरी काँग्रेस नेते मात्र भाजपावर टीका करताना पातळी सोडणार नाहीत. मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही पटोले म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here