मोदी सरकारने शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देऊन शेती साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून लुटले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

Modi government robbed the farmers by paying 6 thousand rupees and imposing 18% GST on agricultural materials
Modi government robbed the farmers by paying 6 thousand rupees and imposing 18% GST on agricultural materials

गडचिरोली: काँग्रेस (Congress) व इंडिया आघाडीचे (India alliance)  सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. वन हक्क कायद्याचे सर्व प्रलंबित दावे एका वर्षाच्या आत निकाली काढणे व नाकारलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन ६ महिन्यांत केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा संकल्प काँग्रेसच्या न्यायपत्रात असून बहुजनांच्या कल्याणासाठी काँग्रेसने विचार करुन जाहिरनामा बनवला आहे. भाजपा आदिवासींना वनवासी म्हणून अपमानीत करून त्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवते परंतु आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले आहे.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ देसाईगंज तालुक्यातील सभेत ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, गडचिरोलीमध्ये नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणात आहे पण ही नैसर्गिक संपदा भाजपा सरकार पोलिसांच्या मदतीने लुटत आहे, सुर्यागडमधील सोने लुटले जात आहे, वनसंपदा तोडून टाकत आहेत. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात, नैसर्गिक संपत्तीची ही लूट थांबवायची आहे. काँग्रेसची सत्ता आली की ही लूट थांबवून गडचिरोलीला आर्थिक राजधानी बनवू.

नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देतात पण खताच्या किंमतीमध्ये हजार रुपयाने वाढ झाली आहे, ट्रॅक्टरला डिझेल लागते तेही महाग केले, बियाणे, औषधे याच्याही किमती वाढवल्या आणि शेती साहित्यावर १८ टक्के जीसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. श्रीमंत व सामान्य शेतकरी दोघांनाही १८ टक्केच जीएसटी लावला जातो. मोदी सरकारच्या १० वर्षांच्या सरकारमध्ये महागाई चारपटीने वाढली, १५ लाख बँक खात्यात जमा करणार होते ते दिले नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले नाही, मग कशाला पुन्हा नरेंद्र मोदींना मतदान करायचे?  असा प्रश्न विचारून भाजपा गरिबांना ५ किलो मोफत धान्य देऊन तुमचा हक्काचा रोजगार हिरावून घेत आहे व सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवत आहे, असे पटोले म्हणाले.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात सर्व जाती धर्मांचा विचार करुन त्यांना न्याय देणारे न्याय पत्र बनवले आहे. राहुल गांधी यांनी पदयात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढला. शेतकरी, कामगार, रोजंदारी करणारे, आदिवासी, ओबीसी दलित, महिला, तरुणांचे दुःख पाहिले व त्यातून या ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी या एका व्यक्तीच्या नाहीत तर पक्षाच्या आहेत व सत्तेवर येताच त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले.  या प्रचार सभेला अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here