मोदी सरकारची एकच निती ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान’: जयराम रमेश

BJP's manifesto is 'Fekunama'; People will not be fooled by BJP's 'electoral gimmick': Nana Patole
BJP's manifesto is 'Fekunama'; People will not be fooled by BJP's 'electoral gimmick': Nana Patole

ओझर, नाशिक, दि. १४ मार्च : मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे २७ सप्टेंबर २०२० रोजी आणले होते परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते तीन काळे कायदे वापस घ्यावे लागले. यासाठी १५ महिन्यांचे आंदोलन व ७०० शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हरित क्रांतीच्या प्रणेत्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मदिनी मोदींना मजबुरीने काळे कायदे वापस घ्यावे लागले. तीन वर्षानंतर पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे, हे आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न झाला. मोदी सरकारने वारंवार शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. मोदी सरकारची एकच निती आहे, चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला.

नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे पत्रकार परिषदेशाला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार केला, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची धमकी दिली पण पुन्हा एकदा मोदी सरकारला झुकावे लागले आणि दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी आंदोलन सुरु झाले तर आजच चांदवडमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावाही पार पडला. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाच गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार एमएसपीचा कायदा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आयात निर्यात धोरण शेतकरी हिताचे करणार, पिक विमा योजनेची पुनर्रचना करणार व शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळणार.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने १० वर्षात केवळ मुठभर श्रीमंत लोकांसाठी काम केले आहे. सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. केंद्रातील मोदी सरकार पायउतार होण्याची वेळ आली असून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस विचाराचे सरकार येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

 विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेसारखे भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात नंदूरबारमध्ये या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळ्यात महिला हक्क परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि चांदवडच्या शेतकरी मेळाव्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकरी, कामगार, तरुण, महिला, सर्वसामान्य जनतेला गॅरंटी देत आहेत. मोदींची गॅरंटी भेदभाव करणारी आहे तर राहुल गांधी यांची गॅरंटी मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.

भारत जोडो न्याय यात्रा आज सकाळी मालेगाव येथून सुरु झाली त्यानंतर चांदवड मध्ये शेतकरी मेळावा झाला. ओझर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले, दुपारच्या विश्रातीनंतर नाशिकच्या द्वारका चौकातून यात्रा पुन्हा सुरु झाली व इंदिरा गांधी चौकात जनतेला संबोधित करुन राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेचा मुक्काम मोखाडा येथे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here