राज्यात ३५३ ठिकाणी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे आंदोलन

आंदोलनातील सर्व विषय मार्गी लावू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Movement of 'Voice of Media' at 353 places in the state
Movement of 'Voice of Media' at 353 places in the state

मुंबई : राज्यातल्या पत्रकार, पत्रकारितेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या मागण्या समोर ठेवत आज राज्यातल्या ३५३ ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांसमोर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या (voice of Media) वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे अडीच हजारांहून अधिक पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांनी दखल घेतली आहे.  

आज केलेल्या मागण्यांत पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. हे विषय घेण्यात आले होते.

मुंबईच्या आझाद मैदानावर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर संपूर्ण राज्याच्या वतीने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय यांचे सचिव यांना मागणीचे निवेदन दिले. प्रभारी माहिती महासंचालक हेमराज बागुल, राहुल तिडके- संचालक वृत्त, जनसंपर्क व दयानंद कांबळे-  उपसंचालक वृत्त, यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मागणी संदर्भात तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी सर्व मान्यवरांनी दिले. राज्यात आज विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, अशा 353 ठिकाणी धरणे आंदोलनात अडीच हजारांपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी राज्यातील ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे आभार मानले आहेत.  

आंदोलनातील सर्व विषय मार्गी लावू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आज राज्यभरामध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चं जे आंदोलन झाले त्या आंदोलनाची माहिती मी घेतली. हे सर्व  महत्त्वाचे विषय आहेत. ते विषयी मी तातडीने मार्गी लावा, अशा सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत. विशेषता अधिस्वीकृती, कोरोनाच्या काळात जे पत्रकार वारले त्यांच्या कुटुंबाचा पुनर्वसन संदर्भातला विषय यावर तातडीने निर्णय होणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’टीव्ही विंगचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे आणि त्यांच्या टीमने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. लागलीच आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागतात, हे फार कमी वेळा घडते. जे आज ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या एकजुटीमुळे घडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने आभार मानले आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here