नेहरुंचे विचार जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत राज्यघटना व लोकशाही अबाधित राहील !: मुकुल वासनीक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरु यांचे योगदान तरुण पिढीला माहिती व्हावे याउद्देशाने प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Mukul Wasnik says Constitution and democracy will remain intact as long as Nehru's thoughts live on
Mukul Wasnik says Constitution and democracy will remain intact as long as Nehru's thoughts live on

मुंबई: महात्मा गांधी यांनी पंडित नेहरु यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होतं हे सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच स्पष्ट केले. मात्र काहीजण नेहरू आणि पटेल यांच्यात वाद होता असे खोटे सांगून संभ्रम निर्माण करतात. पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यावेळच्या नेत्यांच्या सर्वात पुढचा विचार करणारे नेते होते, ते दूरदृष्टी असणारे नेते होते. पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होते, वर्तमानात महत्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही महत्वपूर्ण राहतील, असे प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरु यांचे योगदान तरुण पिढीला माहिती व्हावे याउद्देशाने प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनीक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ माजी मंत्री सुरेश शेट्टी, उल्हासदादा पवार, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे आदी होते.

प्रा. अगरवाल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, नेहरुंवर आज बोलण्याचे कारण हेच आहे की भारतीय संस्कृती व सभ्यता धोक्यात आली आहे.‘आयडिया ऑफ इंडिया’ सोडून ‘दुसरी आयडिया ऑफ इंडिया’ थोपवली जात आहे, त्याला विरोध नाही पण ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. ‘भारत माता की जय’चा नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया व आत्मचरित्रात उल्लेख केला आहे…परंतु आज ‘भारत मात की जय’ला धमकीच्या रुपात पाहिले जात आहे.

महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्याबद्दल भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चर्चा केली जाते, त्यावर बोलले जाते पण पंडित नेहरु यांच्याबद्दल त्यापद्धतीने बोलले जात नाही. त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. या देशाला सर्वात मोठा धोका हा सांप्रदायिकतेचा आहे हे पंडित नेहरुंनी जाणले होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मध्यममार्ग निवडला, भारतीय जिवनाचा सार सम्यक वा मध्यम मार्ग आहे. विविधतेत एकता ही फक्त घोषणा नाही तर आपली जीवनशैली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात वैचारिक मतभेद होते पण ते खुर्चीसाठी नव्हते. बड्या नेत्यांचे मतभेद हे खुज्या लोकांना समजणार नाहीत.

भारताचे स्वातंत्र्य हे साम्राज्यवादाच्या अंताची सुरुवात होता त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जगात अनेक देश स्वतंत्र झाले. आजही जगाच्या पाठीवर इतर देशात गेले तर गांधी, नेहरुंचा देश म्हणून ओळखला जातो. नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महात्मा गांधी व नेहरु यांचा उल्लेख भाषणाच्या सुरुवातीसच उल्लेख केला तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी मान डोलावली पण भारतात येताच गांधी, नेहरुबद्दल खोटा प्रचार हे लोक करतात. काहीही वाचा अथवा अगर वाचू नका पण डिस्कव्हरी ऑफ इंडिया जरुर वाचा असे आवाहनही अगरवाल यांनी केले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत माता कोण आहे? हे ज्यांना माहित नाही तेच लोक ‘भारत माता की जय’ म्हणत त्याच भारतमातेला विकत आहेत. अगरवाल यांनी पंडित नेहरु यांच्या विचाराचा व भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान किती मोलाचे आहे हे अत्यंत साध्या व सोप्या भाषेत पटवून दिले. असे कार्यक्रम राज्यभर राबवून नवीन पिढीली पंडित नेहरु यांच्याबद्दलची माहिती व्हावी यासाठी राबविले जातील. असे कार्यक्रम राबविले तर नेहरु यांच्याबद्दल जो अपप्रचार सुरु आहे तो खोटा असून वस्तुस्थिती समजेल.

यावेळी बोलताना मुकुल वासनिक म्हणाले की, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये एक उर्जा, उत्साह संचारलेला दिसत आहे. ते धडाडीचा नेते असून काँग्रेस संघटन कसे मजबूत करता येईल यावर त्यांचा विशेष भर दिसत आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी, वीरांची भूमी, क्रांतीची भूमी आहे. शिवाजीची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ‘चले जाव’चा आवाज उठला ती भूमी आहे, याच भूमितून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा आवाज उठला होता.

२०१४ च्या निवडणुकीत थापा मारून ज्यांनी सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला, नायक नाही तर खलनायक निघाला अशी टीका त्यांनी मोदींचे नाव न घेता केली.

देशातील काही लोकांना पंडित नेहरु हा मोठा अडथळा वाटत आहेत. परंतु जवाहरलाल नेहरुंचे विचार भारतात जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत भारतीय राज्यघटना, लोकशाही अबाधित राहील. आज देशावर संकट आहे, लोकशाहीवर, राज्यघटनेवर संकट आहे. ही परिस्थिती समजून काँग्रेसची विचारधारा, काँग्रेसचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याची माहिती लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहनही वासनिक यांनी केले

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांच्या ‘कोण आहे भारतमाता’? या पुस्तकाबद्दल आपल्या भाषणात थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांनी केली तर सुत्रसंचालन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर  विनायक देशमुख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here