Mumbai Metro l मुंबई मेट्रो सोमवारपासून धावणार

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सुविधा सोमवारपासून,फेऱ्यांची संख्या निम्म्यावर

metro-train-ready-for-service-from-tomorrow
metro-train-ready-for-service-from-tomorrow

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून (19 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे. सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र प्रवास करताना सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

लॉकडाऊनपासून  ठप्प झालेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून कार्यरत होत आहे.

सोमवारपासून मेट्रोची वारंवारिता साडेसहा ते आठ मिनिटांवर आणण्यात आली आहे. कोरोनापूर्वी तीन ते पाच मिनिटे इतकी होती. त्यामुळे कोरोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होणार आहेत.

सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार मेट्रो प्रशासनाचा विचार सुरु आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.

प्रवासी संख्येवरदेखील नियंत्रण आणले असून एका फेरीत १३५० प्रवाशांऐवजी ३६० प्रवासीच आता प्रवास करू शकतील. प्रत्येक गाडीचे दररोज रात्री र्सवकष र्निजतुकीकरण केले जाईल, तसेच प्रत्येक फेरीनंतरदेखील र्निजतुकीकरण करण्यात येईल. अशी माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी दिली.

मेट्रोने प्रवास करताना या नियमांचे करा पालन

 मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश.

एक सोडून एक आसनव्यवस्थेमुळे १०० प्रवासी बसून प्रवास करू शकतील.

उभे राहून प्रवास करण्यास २६० प्रवाशांना परवानगी.

प्लास्टिक टोकन बंद.

कागदी तिकिट अथवा क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल तिकिटाचा वापर.

रिचार्ज कार्डावरील शिल्लक रकमेवर परिणाम होणार नसून, सहजपणे वापरता येईल. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर जाण्यासाठी केवळ दोन ते चार मार्गाचाच वापर करता येईल.

 प्रत्येक स्थानकात गर्दीनुसार ३० ते ६० सेकंदांचा थांबा.

वातानुकूलित यंत्रणेचे तापमान २५ ते २७ सेंटिग्रेड इतके ठेवले जाईल, तसेच ताजी हवा येण्यासाठी काही बदल केले जातील.

सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या काळात मेट्रो रेल्वेगाडय़ा धावतील.

मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी २२५ लोकल फेऱ्या

मध्य रेल्वेवर सोमवार, १९ ऑक्टोबरपासून आणखी २२५ उपनगरी रेल्वे (लोकल) फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ४८१ वरून ७०६ वर पोहोचेल. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा या मुख्य मार्गावर धिम्या लोकल फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ४९९ फेऱ्या धावतील. यामध्ये ३०९ फेऱ्या धिम्या, तर १९० फेऱ्या जलद मार्गावर आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरील फे ऱ्यांची संख्या १८७ होणार असून ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर एकूण फेऱ्या २० पर्यंत होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

याआधी ट्रान्स हार्बरवरील काही स्थानकांत लोकल थांबत नव्हत्या. मात्र सोमवारपासून मानसरोवर स्थानक सोडता लोकल सर्व स्थानकांत थांबतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here