महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांत पराभवाच्या भीतीने निवडणुका लांबणीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा भाजप,शिंदे गटावर आरोप

municipal-corporations-zilla-parishad-panchayat-samiti-elections-postponed-due-to-fear-jayant-patil-bjp-sangli-news-udate
municipal-corporations-zilla-parishad-panchayat-samiti-elections-postponed-due-to-fear-jayant-patil-bjp-sangli-news-udate

सांगली : राज्यात सत्तातरानंतर भाजप विरोधात जनमत आहे. यामुळे महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांत पराभवाच्या भीतीने निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी पक्षाचे ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्य पदाधिकारी, निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबीराचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ताजे उदाहरण आहे. कुणीतरी सांगावे आणि भाजपने निवडणुकीतून माघारी घ्यावी, हे कसे घडले, हे सर्वांना माहीतच आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक लांब आहे. त्यावेळी आघाड्यांबाबत निर्णय घेऊ. मात्र सध्याचे वातावरण भाजपला अनुकूल नाही. वातावरण अनुकूल झाल्याशिवाय निवडणूका घेण्याची सध्याच्या सरकारची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समितीच्या निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत.

पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. शिबीरात सध्याच्या परिस्थितीसह वेगवेगळ्या विषयावर विचारमंथन होईल. अभ्यासकांचे मार्गदर्शन होईल. पक्षाची सभासद नोंदणी सुरु आहे. अधिक मजबुतीने पक्ष उभारणीसाठी शिबीरात चर्चा केली जाईल. पक्षाला २३ वर्षे पूर्ण झाली असून जून २०२३ रौप्यमहोत्सवी वर्षात प्रारंभ करीत आहे. यातील साडेसतरा वर्षे पक्ष सत्तेत राहून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील ओला दुष्काळासह विविध प्रश्‍नांवर राष्ट्रवादीसह विरोधक आक्रमक आहेत. बेरोजगारी, महागाई, प्रमुख उद्योग गुजरातला जाताहेत. यामागेही केंद्र सरकार आणि राज्यातील सत्ताधारी कारणीभूत आहेत. गेल्या काही दिवसात राज्यातील केंद्राच्या इशाऱ्यावर होत असलेल्या कारवायांबाबत घटनात्मक बाबींवरही चर्चा होईल. राज्यभरातून पदाधिकाऱ्या निमंत्रितांसह पावणेदोन हजार जण शिबीरास उपस्थित असतील, असेही त्यांनी सांगितले.

विस्तार नाराजीमुळे रखडला

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पाटील म्हणाले,‘ मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताहेत. अधिकार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गप्प आहेत. विस्तार केला तर ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, अशा आमदारांच्या नाराजीची भीती त्यांना सतावतेय. ते पुन्हा मूळ ठाकरेंच्या शिवसेना किंवा भाजपतही जाऊ शकतात.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले

आमदार बच्चू कडू, रवी राणा यांच्यातील वादात खरे उघडकीस येईल

आम्हीच केलेल्या घोषणांची सध्याच्या सरकारकडून पुनरावृत्ती

राज्यात बहुतांश निवडणुका महाआघाडी म्हणूनच लढणार


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here