संयमी शरद पवार आमचे कॅप्टन..!

Nationalist Congress Party unanimously re-elects Sharad Pawar as president blog by mehraj patel update today
Nationalist Congress Party unanimously re-elects Sharad Pawar as president blog by mehraj patel update today

शरद पवार (Sharad pawar) म्हणजे अजब रसायन आहे. शरद पवारांच्या मनात काय चालले आहे हे भल्या भल्यांना कळत नाही. त्यामुळेच विरोधकांनाही शरद पवारांबद्दल आदर आहे प्रेम आहे. अशा आमच्या महान नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Nationalist Congress Party) फेरनिवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य पसरले आहे. शरद पवारांच्या पुढील कार्यास शुभेच्छा…! आज रविवारी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियममध्ये (Talkatora stadium Delhi) राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेश होत आहे. पवारांकडून विचारांची शिदोरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली जाणार आहे. ही शिदोरी घेतल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते पक्षवाढीसाठी काम करतील एवढे मात्र नक्की.

शरद पवार हे संयमी नेते आहेत. मैदानातील विरोधकांना पटकी देण्यात ते पटाईत आहे. देशभरातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं. एखाद्या माणसाचे पैलू एवढे असू शकतात?

पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते, ते कळतही नाही. अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात. एकदा तर एका सभेला समोरच्या सभाजनांमधील एका शाळूसोबतीला पवारांनी हाक मारून बोलाविल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री होती. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा मुकेश अंबानी वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे.

पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत. पवारांमुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक चांगली मंडळी राजकारणात आली. ना. धो. महानोर व रामदास फुटाणे यांची उदाहरणं समोर आहेत.

हेही वाचा : भाजपला पवारांच्या बारामतीत ‘विजयाचा रथ’ रोखणे अशक्य!

पवारांच्या सभा मोठ्या मोठ्या नसतात. यालाही अपवाद आहेत. पण ते अगदी स्थानिक पातळीवर जाऊनही प्रचार करतात. पण त्यांची सभा काही तरी देऊन जाणारी असते. श्रोतृवंदाला बांधून ठेवण्याचे काम ते अतिशय चांगले करतात. प्रसंगी तिखट आणि उपहासही त्यांच्या बोलण्यात नेमकेपणाने येतो. विशेषतः विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना हे प्रकर्षाने जाणवते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पुरेपूर माहित आहे. तेथील प्रश्न काय आहेत. याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे ज्या भागात जातात, तेथील प्रश्न, समस्या त्याच्या भाषणात येतात. राजकारणात असल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यामुळे त्यांच्यात आलेल्या बहुश्रुततेचा हा परिणाम आहे. समोरच्याचं ऐकून घेऊन ते समजावून घेण्याची त्यांची वृत्ती नेहमी त्यांना अपडेट ठेवते.

टीका झाली तरी शांतपणे झेलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली. राज्याच्या सुरक्षा यंत्रणेबद्दल प्रचंड टीका होऊ लागली. याच काळात अनेक भ्रष्टाचाराची कथित प्रकरणे उकरून काढण्यात आली. मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनारांनी तर त्यांच्याविरूद्ध जणू मोहिमच ऊघडली. हा काळ पवारांच्या दृष्टीने अतिशय कसोटी पाहणारा होता. पण पवार निश्चल होते. पुढे या सर्व प्रकरणातून ते तावून सुखावून बाहेर पडले.

त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही. १९७७ मध्ये वसंतदादांचे सरकार पाडण्याच्या प्रसंगाताही त्यांनी या कानाचे त्या कानालाही कळू दिले नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९९१ मध्ये छगन भुजबळांसह बारा आमदारांना त्यांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. शिवसेनेला फार मोठा धक्का देण्याचे काम पवारांनी या कृतीने केले. अर्थातच शिवसेना या कृत्याने चवताळली. पण काही करू शकली नाही. आजही भुजबळ पवारांसोबतच आहेत. त्यांचा एखाद्या चालीत झालेला पराभव ते लक्षात ठेवून दुसऱ्या वेळी त्यात यश कसे मिळेल ते पहातात. त्यासाठी योग्य अभ्यासही करतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद हे त्याचे उदाहरण आहे. जगमोहन दालमिया यांनी पहिल्यांदा त्यांचा पराभव केल्यानंतर दुसऱ्यांदा मात्र पवारांनी एवढे हुशारीने जाळे विणले की दालमिया यांच्यासारखा मुरब्बीही त्यात अडकला.

पवारांना माणसं चांगली ओळखता येतात. नेतृत्वगुणांची त्यांना चांगली पारख आहे. अनेकदा एका व्यक्तीने काढलेले पक्ष हे खासगी संस्थान होऊन जाते. त्यात इतरांना फारसे स्थान नसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तसे नाही. तेथे इतरांच्या मतालाही तितकीच किंमत आहे.

पवारांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत. त्यांचा वेधही घेणे अवघड आहे. पण एक बाब मात्र खरी की पवारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा…!

लेखिका मेहराज पटेल (राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षा आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here