कंगनाचा पुरस्कार काढून घ्या आणि अटक करा; नवाब मलिकांचा हल्लाबोल

Congress-minister-nawab-malik-on-kangana-ranaut-statement-about-freedom-news-update
Congress-minister-nawab-malik-on-kangana-ranaut-statement-about-freedom-news-update

मुंबई: भारताला स्वातंत्र्य १९४७ साली भीक म्हणून मिळालं, खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं आहे, अशा आशयाचं वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तिच्या या विधानाचा निषेध केला असून काहींनी तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याचीही मागणी केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही तिचा पुरस्कार परत घेऊन तिच्या अटकेची मागणी केली आहे.

याविषयी त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. कंगनाच्या या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे. मलिक म्हणाले, एक महिला जी चित्रपट अभिनेत्री आहे, केंद्र सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देण्याचं काम केलं आहे. तिच्या विधानाची आम्ही कठोर शब्दांत निंदा करतो.

१८५७ पासून १९४७ पर्यंत या देशातून गोऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. जे लोक गोऱ्यांना पाठिंबा देत होते, त्यांच्या माध्यमातून पद्मश्री दिलेल्या लोकांना अशी विधानं करण्यासाठी पुढे केलं जात आहे की स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं. त्यांनी लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे.

केंद्र सरकारने तात्काळ कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा आणि देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तिला तात्काळ अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली असून, तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय  स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.

शिवसेना खासदार संजय राऊतांनीही केली टीका, म्हणाले…

“फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here