धुळे : आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार Sharad Pawar हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख Mehboob Shaikh यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लगावला. सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही, अशा शब्दात शेख यांनी निशाणा साधला.
सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले.
आपण ज्या नर्सरीत शिकता…
पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणे यांना अपेक्षित आहे का आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब आहेत, हे सिद्ध करुन दाखवल्याचं मेहबूब शेख म्हणाले.
सदाभाऊ खोत कडकनाथ कोंबडीवाले
सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
कार्यकर्त्यांमध्ये काही गोष्टींमुळे नाराजी
धुळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु मेहबूब शेख यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सारवासारव केली. हा परिवार मेळावा होता आणि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असण्याचा संबंध येत नाही, कार्यकर्त्यांमध्ये काही गोष्टींमुळे नाराजी असल्याने त्यांच्या मनातील काही प्रमाणात असलेला राग त्यांना व्यक्त करायचा होता, असं शेख यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी नाही
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील घडल्या प्रकाराबाबत माहिती देताना असं काही नेमकं घडलंच नाही, असं सांगितलं. कार्यकर्त्यांच्या मनात काही गोष्टींची शंका होती. ती विचारताना शाब्दिक चकमक झाली, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी नाही, असंही चाकणकर यांनी सांगितलं.