मुंबई:कर्जतमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचा दोन दिवसीय मेळावा पार पडला. या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीकास्र सोडलं. वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, असा काहींना अनुभव आहे, अशी अप्रत्यक्ष टीका अजित पवारांनी केली. अजित पवारांच्या टीकेला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं.
“यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावणीला बांधायचा होता. हा पक्ष एका वेगळ्या पक्षात विलीन करायचा होता. सत्तेत जायचंय हे आधीच ठरलं होतं. त्यासाठी त्यांना हा पक्ष त्यांच्या हातात पाहिजे होता. यामध्ये शरद पवार अडसर ठरत होते म्हणून त्यांना बाजूला काढायचे होते. एवढे दिवस आम्ही बोलत नव्हतो, पण तुम्ही शरद पवारांवरच बोलायला लागलात तर आम्हाला सगळंच सत्य सांगावं लागेल,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. काकांनीच राजकीय जन्म दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती. आता त्याच चुलत बहिणीच्या घरी जाऊन तुम्ही तिला ओवाळायला सांगता. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या पोरीला कुणी छळलं? या छळाला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही? मी कधीच कुणाबद्दल काही बोलत नाही. मी आजपर्यंत कोणाचंही तोंडातून नाव काढलं नाही. पण तुम्ही माझं नाव घेत असाल तर मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही. बीडमध्ये मुंडे नावाच्या तरुणाला मारहाण झाली ती कुणी केली? आजही गुन्हा दाखल झाला नाही,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, असा काहींना अनुभव आहे, या अजित पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “वंशाचा दिवा, मुलं आणि मुली इथपर्यंत तुम्ही खाली घसरला आहात. तुम्ही पवार नसता तर बारामतीतून तुम्ही निवडून आला असता का? मी त्यांच्या घराण्याचा नाही, हा माझा दोष आहे का? असं तुम्ही म्हणता. आहो तुमची पुण्याई आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या (शरद पवार) घरात जन्माला आला आहात. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्ही ४ वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळालं नसतं. बंडखोरीनंतरही तुम्हाला पुन्हा पक्षात घेतलं नसतं. जे स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. स्वत:च्या चुलत बहिणीचे हाल हाल केले.”