मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन (Drug Case) पुन्हा एकदा नाव न घेता समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना पुन्हा एकदा नाव न घेता समीर वानखेडे यांना लक्ष्य केलंय. ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपण आणि ते एकाच ठिकाणी नमाज पठण करण्यास जायचो असंही म्हटलंय. तसेच त्यांनी माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात फसवून ८ महिने तुरुंगात ठेवलं, असा आरोप केला.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 5, 2021
नवाब मलिक म्हणाले, “मी जिथं नमाज पठण करायला जायचो तिथंच तेही नमाज पठण करायला यायचे. नंतर मला समजलं की त्यांनी अनुसुचित जातीचं प्रमाणपत्र वापरलं. हे उघड होऊ नये म्हणून त्यांनी माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात अडकवलं. त्यांना अटक करण्यात आलं आणि ८ महिने त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. शेवटी त्यांना जामीन मिळाला आणि त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने फसवल्याचं म्हटलं.”
“…म्हणून मी साडेआठ महिन्यांपूर्वी बोललो नाही”
“यानंतर आम्ही आर्यन खान प्रकरणातील यांचा फर्जीवाडा समोर आणला. माझ्या जावयाला अडकवलं म्हणून मी बोललो असं नाही. जावयाला अटक केलं तेव्हा मी यासाठी नाही बोललो की तेव्हा लोक म्हटले असते जावयाला अटक केल्यानं बोलत आहेत. म्हणून मी साडेआठ महिन्यांनी या विषयावर बोललो. याबाबत आम्ही सर्व गोष्टी न्यायालयात ठेऊ,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
यावेळी नवाब मलिक यांनी गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जवरूनही हल्ला चढवला. या सर्व प्रकरणांचा संबंध गुजरातशी कसा येतो असाही सवाल केला.