मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचा चौथ्यांदा ‘विक्रम’!

भाजप,प्रहार,बंडखोरांना जोरदार धक्का

NCP's Vikram Kale's 'Vikram' for the fourth time in the Marathwada teacher's constituency!
NCP's Vikram Kale's 'Vikram' for the fourth time in the Marathwada teacher's constituency!

औरंगाबाद: मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (vikram kale) यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. तर मराठावाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी देखील चांगली कामगिरी करत पहिल्या पसंतीची तब्बल ११ हजार मते मिळवत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे महाविका आघाडीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील असे चित्र मतदानापुर्वी आणि नंतर देखील रंगवले जात होते. काँग्रेसचे प्रा.किरण पाटील (kiran patil) यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली होती. पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. तर राष्ट्रवादीचे बंडखोर प्रा.प्रदीप साळुंके, प्रहारचे संजय तायडे यांना धूळ चारली. काळेंचा चौथ्यांदा विजय झाल्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्य पसरले आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपने काँग्रेसचे किरण पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली होती. मात्र, काळे यांचे काम आणि संघटनाच्या कौशल्यावर त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. पहिल्या पसंतीचे 20 हजार 79 मते काळे यांनी घेतले तर भाजपच्या पाटील यांनी 13 हजार 489 मते घेतली होती. दुस-या फेरीमध्ये काळेंनी आघाडी घेतली असून विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे.  विशेष म्हणजे महाविकास आघाडीसह भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.

विक्रम काळे पुढे म्हणाले की, विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदानित करणे आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करणे हे मुख्य दोन प्रश्न सोडविणे हेच माझे पुढील काळातील ध्येय असल्याचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे आ. विक्रम काळे यांनी सांगितले.

विक्रम काळे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात होते. मराठवाड्यातील प्रत्येक शिक्षकाला अगदी सहज उपलब्ध होणारा आमदार अशी माझी ओळख आहे. शिवाय ‘आमदार आपल्या दारी’, ‘शिक्षक दरबार’ उपक्रम सुरू करणारे पहिले आमदार आहे. आघाडी सरकार असताना शाळा, वर्गतुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढला. विनाअनुदान शाळांची संच मान्यता व वैयक्तिक मान्यता सुरू केली, मोफत पाठ्यपुस्तक व शालेय पोषण आहार योजना लागू करून घेतली, सहावा व सातवा वेतन आयोग लागू केला. विद्यार्थी पटसंख्या २० व २५ वर केली. शिक्षण सेवकांचे नाव बदलून सहायक शिक्षक करून घेतले, वाढत्या महागाईमुळे शिक्षकांचे मानधन दुप्पट करून घेतले. महिला शिक्षकांच्या प्रसूती रजेमध्ये वाढ करून घेतली. कनिष्ठ महाविद्यालयीन व एमसीव्हीसी शिक्षकांचा अनेक वर्षापासूनचा जिव्हाळ्याचा पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवून घेतला. प्राध्यापक भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षण लागू करून घेतले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करून घेतली.

कोरोना सारख्या संकट काळात तीन वर्षे २०१९-२० ची संचमान्यता कायम ठेवली. वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाइन केले. कोरोना व म्युकर मायकॉसिस या महागड्या आजाराचा समावेश वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तीच्या यादीत केला. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर अनेकवेळा सभात्याग करण्याची भूमिकादेखील घेतली. यापुढे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

विद्यार्थी गुणवत्तेसाठी प्रयत्न करणार

विद्यार्थी हे आमचे दैवत आहे. विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे. शाळा आहे म्हणून शिक्षक आहे. हे सूत्र आम्हाला मान्य आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वाचाल तर वाचाल या संकल्पनेतून शासनाच्या नियमात बसणाऱ्या मराठवाड्यातील माध्यमिक शाळा, जि. प. शाळा , कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा अशा एकूण ३ हजार ३०० शाळा- महाविद्यालयात ११ लाख २५ हजार पुस्तकांचे वितरण केले.
त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी गुणवत्ताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. पवित्र पोर्टल रद्द करावे, अशी आमची मागणी नाही. परंतु, त्यातील काही त्रुटी दूर करायला हव्यात. संचमान्यता होत नाही, तोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही. शिक्षकांच्या अनेक जागा, पदे रिक्त आहेत. संचमान्यता व समायोजन झाल्यानंतर नक्की किती जागा रिक्त आहेत, हे समजू शकेल असे आ. काळे म्हणाले.

प्रचलित अनुदान लढा सुरूच राहणार

शाळा अनुदानासाठी प्रचलित धोरण जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे. पेन्शन हा विषय शिक्षकांच्या जीवनाशी आणि कुटुंबाशी निगडित आहे. सेवा निवृत्ती नंतर पेन्शन हा मोठा आधार असतो त्यामुळे जुनी पेन्शन योजना मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मी आतापर्यंत कोणासोबतही पक्षभेद केला नाही. तसे आमच्या वडिलांचे संस्कार आहेत. मी कोणावरही टीका करण्याच्या भानगडीत पडत नाही. ही निवडणूक बुद्धिवंत, विचारवंतांची आहे. त्यामुळे मी काय केले आणि पुढे काय करणार हेच सांगत आलेलो आहे. कोण आपले प्रश्न सोडवू शकतो, याची जाणीव मतदारांना असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here