नितीशकुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम; काँग्रेसचा हल्लाबोल

इंडिया आघाडीवर परिणाम नाही, केंद्रात सत्ता आणूl; रमेश चेन्नीथला यांनी जिल्हानिहाय आढावा बैठकीत लातूरमध्ये व्यक्त केला विश्वास

Nitishkumar is the biggest palturam in the country; Congress attack
Nitishkumar is the biggest palturam in the country; Congress attack

मुंबई, लातूर: इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार Nitesh kumar JDU यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीशकुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीशकुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये काँग्रेससह राष्ट्रीय जनता दल एकत्र निवडणुका लढवत आहे आणि केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसची मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक लातूरमध्ये संपन्न झाली, त्यावेळी रमेश चेन्नीथला पत्रकार परिषदेला संबोधित करत होते, ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस पक्षाने मागील निवडणुका एकत्रितपणे लढवल्या होत्या आताही काँग्रेस व राजद मिळून निवडणुका लढवतील व बिहारमध्ये सर्वात जास्त जागी विजय मिळवू. नितीशकुमार यांची विचारधारा काय आहे व आदर्श काय आहेत, हे जनतेला समजले आहे. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. खासदार राहुल गांधी देशासाठी जे काम करत आहेत त्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे. भारत तोडो शक्तीच्या विरोधात राहुल गांधींनी भारत जोडो साठी ४ हजार किमीची पदयात्रा काढली होती आता मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजपा घाबरले आहे म्हणूनच न्याय यात्रेत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत परंतु राहुल गांधी या सर्वांचा मुकाबला करत जनतेच्या प्रचंड समर्थनासह आगेकूच करीत आहेत, महाराष्ट्रातही न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करु.

 विभागीय बैठका आयोजित करुन सर्व जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस एकदिलाने काम करत असून जिल्हा व ब्लॉक स्तरावरही काम सुरु आहे. काँग्रेस हे एक शक्तीशाली संघटन असून ते आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. या आढावा बैठकानंतर १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळ्यात एक शिबीर होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकेल असा विश्वास आहे.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत, सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत जे पक्ष भाजपाविरोधात लढत आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातही लोकसभेच्या सर्वात जास्त जागा मविआच जिंकेल व राज्यातील लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवून भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करु, असे पटोले म्हणाले.

भाजपा सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. भाजपा सरकार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका निवडणुका घेत नाही. जाहिरातीच्या आधारावर स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, महागाई, बेरोजगारी वाढली आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. मुंबईत सहा दिवसात २७ लाख लोकांचे सर्वेक्षण केले अशा बातम्या दिल्या जात आहेत, हे लोक बंद घरांचे सर्वेक्षण करत आहोत का? २०१४ साली मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु अजून आरक्षण दिले नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

लातूर येतील विभागीय बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, AICC चे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आमदार धीरज देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, लातूर जिल्हा ग्रामीणचे श्रीशैलश उटगे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here