ShivSena : भाजपलाच जागा दाखवण्याची वेळ आली; अमित शहांना शिवसेना नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर

shivsena-uddhav-thackeray-faction-slams-pm-narendra-modi-on-evm-scam-news-update
shivsena-uddhav-thackeray-faction-slams-pm-narendra-modi-on-evm-scam-news-update

मुंबई: ‘राजकारणात सगळे काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. आता वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची,’ असा जोरदार हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी हा हल्ला तेवढ्याच कठोर शब्दांनी परतवून लावला. भाजपलाच जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत आणि मनीषा कायंदे यांनी शहा यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तरे दिली.

यातच शिवसेनेचा विजय आहे : अंबादास दानवे

गेल्या महिन्यात उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला केला, असा आरोप करण्यात आला होता. काही पुरावे नसताना रात्री गुन्हे दाखल केले होते. मात्र आम्ही अशा दडपशाहीला घाबरत नाहीत, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. अमित शहांसारख्या माणसाला इथे येऊन बाजू मांडावी लागते, मुंबई महापालिकेच्या तयारीसाठी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेतृत्वाला यावे लागते यातच शिवसेनेचा विजय आहे, असेही दानवे म्हणाले.

एवढ्या लवकर इतिहास कसा विसरला : डॉ. नीलम गोऱ्हे

अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म पाळा, असे सांगितले होते. मोदींना जबाबदारी तशीच ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे यांनीही सुनावले होते. मात्र एवढ्या लवकर तुम्ही इतिहास कसा विसरलात, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही. जनतेच्या दरबारात जे काय होईल ते होईल. त्याच्या आधीच कोणी दर्पोक्ती कोणी करू नये, असेही गोऱ्हेंनी ठणकावले.

हेही वाचा : Narendra Modi : नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप;शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल

भाजपला जमीन दाखवण्याची वेळ : चंद्रकांत खैरे

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या मीटिंगला मी शिवसेना नेता म्हणून हजर होतो. त्या वेळी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्यावर चर्चा झाली होती. एवढे होऊन जर अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना धोका दिला म्हणत असतील तर ती चीड आणणारी गोष्ट आहे. संपूर्ण देश म्हणत आहे, आता भाजपला जमीन दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हीच यांना जमीन दाखवू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.

अमित शहांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही : मनीषा कायंदे

भाजप स्वबळावर निवडणुका का लढवत नाही? अमित शहांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. कोण कोणाला धडा शिकवेल हे ठरवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली. शिवसेना संपवण्याचा दिल्लीश्वरांचा डाव आमच्यातीलच काही लोकांना सोबत घेऊन रचला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा : भाजपला पवारांच्या बारामतीत ‘विजयाचा रथ’ रोखणे अशक्य!

सत्तेसाठी धोका अन् खोकाही..! : किशोरी पेडणेकर

भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये समोर आले आहे. खोके कोणी कोणाला दिले आणि धोका कुणाबद्दल झाला हे आता नव्याने सांगायची गरज नाही. कोण कोणाला धोका देतोय, कोण कोणाला खोके देतोय, कोण कोणाचे बोके पळवतोय हे माहीत आहे, अशी टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

भाजप मूळ समस्यांपासून मिसिंग : खा. अरविंद सावंत

भाजपचे सगळे मिशनच असते. आज काय लोटस मिशन, उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात, अशी टीका खा. अरविंद सावंत यांनी केली. अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजप दूर आहे. मुंबई महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही हलवू शकत नाही, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.

            

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here