
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा2021 (Maharashtra Teacher Eligibility Test) अर्थात (टीईटी) परीक्षेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आतापर्यंत तीन वेळा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार होती. मात्र 30 ऑक्टोबर रोजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे बदलली तारीख
याआधी 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा नियोजित होती. मात्र त्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करुन 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र या दिवशी देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुन्हा बदलली असून आता 21 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवारांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत. यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.
राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.