
मुंबई: राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची (omicron) असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता,त्यामूळेच निर्बंध लागू केले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
“याची गती अशीच वाढत गेली तर तिसरी लाट तर ती ओमायक्रॉनची असेल. जर ओमायक्रॉनची गती आणखी वाढत गेली ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊनबाबत विचार करत आहोत. ज्या दिवशी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल तर ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता कदाचित ५०० वर आणावी लागेल अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते,” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यात विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्बंधांचा उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे.
देशात काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली असली तरी राज्यात मात्र रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.
दरम्यान, आरोग्य भरतीतील परीक्षांबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
“आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही. इथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली,” जाईल असंही टोपे यांनी सांगितलं आहे.