महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा आज सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’मोर्चा

नागरिकांनी मोठ्या संख्येने हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हावे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

The government's conspiracy to postpone the assembly elections!
The government's conspiracy to postpone the assembly elections!

नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी दिनांक ११ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहे, विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा CWC सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे NCRB च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत. राज्यात विविध खात्यातील २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार नोकर भरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण सरकार परिक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचे हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here