मुंबई: राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीविरोधात विरोधी पक्षांची एकजूट व्हावी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रयत्न करत आहेत. मुंबईत आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, ही चर्चा सकारात्मक असेल असा विश्वास माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem khan) म्हणाले.
नसीम खान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे मुंबईच्या विमान तळावर स्वागत केले. त्यानंतर नसीम खान म्हणाले की, कर्नाटक विधानसभेचा प्रचार संपवून मी कालच मुंबईत आलो आणि नितीशकुमार व तेजस्वी यादव यांचे स्वागतासाठी आलो. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांची या नेत्यांनी आधीच भेट घेतली आहे.
आगामी निवडणुकीसाठी देशपातळीवर विरोधकांना एकत्र आणण्याचे काम ते करत आहेत. सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे कठीण नाही. नितीशकुमार यांच्या विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना आजच्या भेटीमुळे आणखी बळ मिळेल, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला.