औरंगाबाद : जे गरीब व गरजू व्यक्ती शिवभोजनाचा (Shiv Bhojan Thali) लाभ घेत आहे अशा लाभार्थ्यांना जो केंद्र चालक 10 रुपया पेक्षा जास्त पैसे आकारतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले – नेटके यांनी दिला आहे. जे शिवभोजन केंद्रचालक काही गरबड करत असतील तर त्यांच्याविरुध्द अन्नधान्य वितरण अधिकारी, तससिलदार यांचेकडे तक्रार दाखल करा. असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवभोजन योजना २६ जानेवारी २०२० पासून सुरु झालेले असून औरंगाबाद शहरामध्ये ३६ शिवभोजन केंद्र कार्यरत असून सदर शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. केंद्रामधून रोज ४ हजार १०० गरीब व गरजू लाभार्थ्यांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या शिवभोजन केंद्रामधून स्वच्छ, पोषक व पदार्थांची गुणवता राखून चांगल्या प्रकारे सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा व अधिक पारदर्शकता यावी या दुष्टीने १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तसेच स्थानिक तहसिलदार यांचे मार्फत औरंगाबाद शहरातील ३५ शिवभोजन केंद्राची अचानक तपासणी करण्यात आली.
सर्व केंद्र चालक यांना स्वच्छता तसेच अधिक चांगल्या दर्जाचे शिवभोजन लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देणे बाबत सूचना देण्यात आल्या. तसेच ५ शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही कार्यान्वनीत नसल्यामुळे त्यांना तात्काळ सीसीटीव्ही बसविणेबाबत निर्देश देण्यात आले व त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येत असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे व दोन शिवभोजन केंद्रामधून दर्जाचे अन्न देण्यात येत होते. तसेच त्यांचे केंद्रावर अन्न पदार्थ बनवलेले नसल्याचे दिसून आल्यामुळे त्यांचे विरुद्ध अतिगंभीर स्वरुपाचे दोष विचारात घेवून कारवाई करण्यात येत आहे.