लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा शेतकरी, जवानांबद्दल एक शब्दही नाही केवळ राजकीय भाषण : नाना पटोले

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

PM's farmers from Red Fort, not a word about soldiers, only political speeches: Nana Patole
PM's farmers from Red Fort, not a word about soldiers, only political speeches: Nana Patole

मुंबई  : हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला आणि देश संपन्न झाला. ७८ वर्ष हा तिरंगा डौलाना फडकत आहे पण आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खा. हुसेन दलवाई, आ. राजेश राठोड, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, सचिव झिशान अहमद, श्रीरंग बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन पटोले म्हणाले की, आजच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संदेश देतात, ही परंपरा आहे पण मागील १० वर्षापासून लाल किल्ल्यावरुन राजकीय भाषणबाजी केली जात आहे. पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणात शेतकरी, कामगार, देशाचे रक्षण करणारा जवान, बेरोजगारी या महत्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. पश्चिम बंगाल मध्ये एका डॉक्टर मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करुन त्या राज्याला टार्गेट केले. पश्चिम बंगाल मधील घटनेचे समर्थन कोणीही करत नाही. अशाच व यापेक्षा भयंकर घटना गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह भाजपाशासित राज्यात झाल्या त्यावर पंतप्रधानांनी कधीच भाष्य केले नाही, पण पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले.

गांधी-नेहरु कुटुंबावर टीका करताना भाजपामधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी- नेहरु कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याग केला आहे. या कुटुंबाने आपली संपत्तीसुद्धा देशासाठी दान केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला पण २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे माननारे काही लोक आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे, असे  नाना पटोले म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकार हे गुजरातधार्जिणे आहे हे आम्ही सातत्याने सांगतो त्याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. नारपार योजनेतील १२६ टीएमसी पाण्यातील ५० टक्के हिस्सेदारी खान्देशाला मिळाली पाहिजे अशी स्थानिकांची अपेक्षा होती पण राज्याच्या वाट्याला केवळ १० टीएमसी पाणी मिळत आहे. बाकीचे पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यावरून हे सरकार गुजरात धार्जिणे आहे हे पुन्हा सिद्ध होत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here